
संकटात ग्रामस्थांची माणुसकीची साथ; खेर्डीत आजारी असलेल्या शेतकऱ्याच्या भातलावणी साठी गाव धावले
माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा हृदयस्पर्शी अनुभव चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील देऊळ-वरचीवाडीत पाहायला मिळाला. मुंबईत उपचारासाठी दाखल असलेल्या शेतकरी गजानन (आप्पा) शेवेकर यांच्या शेतीतील भातलावणी रखडू नये, यासाठी ग्रामस्थांनी एकदिलाने पुढाकार घेत सामूहिक श्रमदानातून संपूर्ण भातलावणी पूर्ण केली.
रविवारी सकाळी महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने शेवेकर यांच्या शेतात एकत्र जमले. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता सर्वांनी उत्साहाने श्रमदान करत अल्पावधीत भातलावणीचे काम पूर्ण केले. या सामाजिक उपक्रमामुळे उपचारासाठी मुंबईत असलेल्या शेवेकर कुटुंबाला मोठा मानसिक आधार मिळाला.
या उपक्रमाचे नियोजन संतोष तांदळे, संतोष उतेकर, मंगेश पवार, दिलीप शेवेकर, राजा पाष्टे, गोविंद भोसले आणि प्रकाश फाळके यांनी केले. त्यांच्या आवाहनाला देऊळ-वरचीवाडीतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकजुटीचे दर्शन घडवले.
आजच्या धकाधकीच्या आणि स्वकेंद्रित जीवनशैलीत एका संकटग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीसाठी संपूर्ण वाडी एकवटली. या उपक्रमातून ग्रामीण भागातील परस्पर सहकार्य, सामाजिक बांधिलकी आणि संकटात एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची समृद्ध परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. खेर्डीतील या माणुसकीच्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, समाजाला प्रेरणा देणारे हे उदाहरण ठरत आहे




