
डेरवण फाट्यावर दुचाकी-आयशरची धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डेजवळील डेरवण फाटा येथे रविवारी दुचाकी आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते असून त्याच्यावर डेरवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तसेच घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, डेरवण फाटा परिसरात वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी या ठिकाणी तातडीने गतिरोधक उभारावेत, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत असली तरी संबंधित यंत्रणेकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते केतन पवार यांनीही प्रशासनाला इशारा देत, डेरवण फाट्यावर तातडीने गतिरोधक उभारण्यात यावेत, अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
सतत होणारे अपघात, वाढती वाहतूक आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे डेरवण फाटा हा अपघातप्रवण ठिकाण बनला असून, आणखी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.




