
लांज्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुरडीवर हल्ला; चार वर्षीय बालिका जखमी
लांजा : लांजा शहरातील सार्दळवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जखमी बालिकेचे नाव स्वम्भवी समीर तानवडे (वय ४) असे असून, ती घराच्या अंगणात खेळत असताना आठ ते दहा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर अचानक झडप घातली. कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिका जखमी झाली.
आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावत बालिकेची सुटका केली. त्यानंतर तिला प्रथम स्थानिक स्तरावर उपचारासाठी नेण्यात आले आणि पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर सार्दळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने त्वरित आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.




