
चिपळूण व्यापारी महासंघटनेचा ‘महाराष्ट्र बंद’ला नकार; व्यापाऱ्यांना स्वेच्छेने निर्णय घेण्याचे आवाहन
चिपळूण : वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी होण्यास चिपळूण व्यापारी महासंघटनेने असमर्थता दर्शविली आहे. याबाबतचे पत्र महासंघटनेने वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षांना पाठविले असून, व्यापाराशी संबंधित नसलेल्या राजकीय बंदमध्ये सहभागी न होण्याची महासंघटनेची भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईत जखमी झालेल्या विद्यार्थी आणि पोलिस कर्मचाऱ्यांबद्दल महासंघटना सहवेदना व्यक्त करते. या घटनेची वस्तुस्थिती लवकरच समोर येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
मात्र, मागील काही बंद आणि आंदोलनांमुळे व्यापारी वर्गाला वारंवार आर्थिक फटका बसत असल्याने व्यापारी महासंघटनेच्या विशेष सभेत व्यापाराशी थेट संबंध नसलेल्या कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे २३ जुलै रोजी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होणे शक्य नसल्याचे महासंघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र, ज्या व्यापाऱ्यांना स्वेच्छेने आपली दुकाने बंद ठेवायची असतील, त्यांच्या निर्णयाला महासंघटनेचा विरोध नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हे पत्र महासंघटनेचे अध्यक्ष किशोर रेडीज, कार्याध्यक्ष कांता चिपळूणकर, सचिव उदय ओतारी, खजिनदार शैलेश सावंत, पीआरओ श्रीनाथ खेडेकर तसेच सल्लागार बापूसाहेब काणे आणि उमेशशेठ काटकर यांच्या वतीने देण्यात आले आहे.




