बँकेच्या नऊ शाखा, १५९ खाती आणि २३.१९ कोटींची फसवणूक; बनावट सोन्याचा मोठा पर्दाफाश!

नागपूर : आयसीआयसीआय बँकेच्या नागपूर विभागातील नऊ शाखांमध्ये बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून तब्बल २३ कोटी १९ लाख ४१ हजार ७५१ रुपयांचे कर्ज उचलल्याचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने दिनेश कृष्णराव नागपूरे (रा. शेषनगर, नागपूर) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हा प्रकार उघडकीस कसा आला?

धनंजय रमेश थिटे (वय ४९) हे आयसीआयसीआय बँकेच्या अजनी चौक येथील झोनल कार्यालयात झोनल हेड म्हणून कार्यरत आहेत. मनिषनगर शाखेत गोल्ड लोनचे अंकेक्षण करताना तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी सर्व शाखांचे अंकेक्षण करण्याचे आदेश दिले.

अंकेक्षणात काय आढळले?

अंकेक्षणात बँकेच्या नऊ शाखांमधील १५९ खातेदारांनी बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेतल्याचे समोर आले. या प्रकारामुळे बँकेची २३.१९ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

नेमका आरोप कोणावर आहे?

तक्रारीनुसार, जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत खातेदार सचिन रौत, व्हॅल्यूअर नंदू खरवडे, प्रथम ऑडिटर राजेंद्र शिळणकर, प्रमोद टेटे, धनंजय ढोमणे, शाखा प्रमुख पंकज केकतपूरे आणि अन्य १५२ खातेदारांनी संगनमत करून बनावट दागिने खरे असल्याचे भासवत बँकेकडून कर्ज घेतले.

या प्रकरणात आतापर्यंत किती जणांना अटक झाली?

या गुन्ह्यात यापूर्वी प्रमोद भैय्याजी टेटे, राजेंद्र पुंडलिकराव शिळणकर, पंकज प्रभाकर केकतपुरे आणि नंदू श्रीहरी खरवडे यांना अटक करण्यात आली होती. आता दिनेश कृष्णराव नागपूरे यालाही अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुन्हा कुठे दाखल झाला आहे?

या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे.

कारवाई कोणी केली?

ही कारवाई पोलीस उपआयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तोकलवाड, पोलीस अंमलदार राघोजी चिलगर, भाऊराव देशमुख आणि महिला पोलीस हवालदार योगिता पोटभरे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button