
अपना सपना मनी..मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठीप्रत्येकी १५ कोटींचा ॲडव्हान्स – खासदार संजय राऊत
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी आहे, ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे. अपना सपना मनी… मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी… आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!असं राऊत यांनी म्हटलं आहे. या ट्विटमध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे. त्यामुळे आज रात्री मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे समोर आले आहे.
ठाकरेंचे खासदार दिल्लीत
राज्यात गेल्या काही काळापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही खासदार दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील हे दिल्लीला गेले आहेत. या खासदारांना 15 कोटी रुपये दिले जाणार असल्याचे विधान राऊत यांनी केले आहे.सूत्रांनी दिलेल्या मागितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. 19 जून रोजी शिवसेना पक्षाचा स्थापनादिन आहे. याच्या आधीत हे सर्व खासदार आपला वेगळा गट स्थापन करणार असल्याचे समोर आले आहे. हे खासदार उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना वेगळा गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले जाणार असल्याचेही समोर आले आहे. यानंतर हा गट दुसऱ्या एखाद्या पक्षात सामील होऊ शकतो आणि एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, ठाकरे गटाचे खासदार नाराज खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचेही समोर आले होते. मात्र आता घडामोडींना वेग आला आहे, काही खासदारांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. आता हे खासदार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




