
वेरळ येथील नव्या उड्डाणपुलावरील रस्ता खचला; वाहनचालकांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील वेरळ येथे हॉटेल गणपती कृपा समोरील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावरील रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्याच पावसात मातीच्या भरावावर करण्यात आलेले काँक्रीटीकरण खचण्यास सुरुवात झाली असून रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्याचे समोर आले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ता खचल्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. उड्डाणपुलाच्या मध्यभागी डिव्हायडरचे काँक्रीटीकरण अद्याप अपूर्ण असून लोखंडी सळ्या उघड्यावर राहिल्या आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात या सळ्यांमुळे अपघाताचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, आवश्यक ठिकाणी संरक्षण कठडे नसल्याने वाहनचालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) तातडीने दुरुस्ती करून सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.




