दापोलीत नोकरीच्या आमिषाने तरुणीला १० लाखांचा गंडा; सायबर भामट्याकडून फसवणूक


रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे नोकरीच्या शोधात असलेल्या २२ वर्षीय तरुणीची सायबर भामट्यांनी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वर्कइंडीया वेबसाईटच्या माध्यमातून नोकरी शोधणाऱ्या या तरुणीला कराराच्या बहाण्याने जाळ्यात ओढून ही लूट करण्यात आली आहे.
दापोली येथील आसूद येथे राहणाऱ्या युवतीला हिने ४ जून २०२६ रोजी वर्कइंडीया या वेबसाईटवर अकाउंट्सच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर, आरोपीने तरुणीशी संपर्क साधून तिला एक नोकरीविषयक करार (अँग्रीमेंट) व्हॉट्सॲपवर पाठवला. मात्र, संबंधित काम आवडीचे नसल्याने महेक हिने तो करार रद्द करण्याची विनंती केली.
याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने हातसफाई सुरू केली. करार रद्द करण्याच्या नावाखाली त्याने तरुणीकडे विविध शुल्काची मागणी केली. या भामट्याच्या भूलथापांना बळी पडून महेकने ६ जून २०२६ ते १२ जुलै २०२६ या कालावधीत गुगल पे, फोन पे आणि ऑनलाईन बँकिंगद्वारे वेळोवेळी आरोपीने दिलेल्या विविध बँक खात्यांवर एकूण १० लाख ३०० रुपये जमा केले.
आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महेक हिने याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस आता या सायबर गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.ऑनलाईन नोकरी शोधताना अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या कराराच्या किंवा शुल्काच्या मागण्यांना बळी न पडता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button