खोंडे येथे वृद्ध मजुरावर लोखंडी पाईपने हल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

खेड : तालुक्यातील खोंडे येथील निकम चाळ परिसरात एका ५५ वर्षीय मजुरावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालीकुमार भक्तु मेहता (वय ५५, मूळ रा. चंपाडी, झारखंड, सध्या रा. खोंडे, ता. खेड) हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. मंगळवारी (दि. १४) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ते जेवणासाठी निकम चाळ येथील आपल्या खोलीवर आले होते. खोलीच्या खिडकीत ठेवलेली चावी घेत असताना शेजारी राहणारा विश्वास विलास निकम (वय ४०) हा त्यांच्या पाठीमागून आला.
यावेळी आरोपीने कोणत्याही कारणाशिवाय मेहता यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने जोरदार प्रहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात मेहता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर जखमी मेहता यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विश्वास विलास निकम याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता, २०२३ च्या कलम ११८(१) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button