
पर्यावरण संवर्धनातील उल्लेखनीय कार्याची दखल; सौ. ज्योती कदम यांना राज्याचा प्रतिष्ठेचा ‘वनश्री पुरस्कार
‘
खेड : पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि हरित महाराष्ट्राच्या उभारणीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राज्य शासनाने मंडणगड तालुक्यातील सौ. ज्योती ( काकी ) रामदासभाई कदम यांची प्रतिष्ठेच्या ‘वनश्री पुरस्कारासाठी’ निवड जाहीर केली आहे. त्यांच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
सौ. ज्योती कदम यांनी मंडणगड तालुक्यात विविध प्रजातींच्या सुमारे ४५ हजार वृक्षांची लागवड व संवर्धन करून हरित पर्यावरणाच्या जतनासाठी मोलाचे योगदान दिले आहे. वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल राज्याच्या मूल्यांकन समितीने घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर केला आहे.
त्यांच्या कार्यामुळे परिसरात हरित चळवळीला चालना मिळाली असून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या प्रेरणेतून अनेक नागरिक वृक्षलागवड व संवर्धन उपक्रमात सहभागी होत असल्याचेही सांगितले जात आहे.
हा पुरस्कार केवळ सौ. ज्योती कदम यांचा वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून भविष्यातही त्यांच्या पर्यावरणपूरक कार्याला अशीच यशस्वी वाटचाल लाभो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.




