पुरग्रस्तांना तातडीने मदत द्या; खेड तालुका महाविकास आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

खेड : तालुक्यात आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी, गोरगरीब नागरिक आणि पूरग्रस्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधितांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खेड तालुका महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली. यासंदर्भात तहसीलदार सुधीर सोनवणे यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन निकम यांनी जगबुडी नदीतील गाळ उपसण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा होत असताना, खेड शहरातील बाजारपेठ आणि वस्ती भाग दरवर्षीप्रमाणे यंदाही पाण्याखाली गेल्याने या कामांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गाळ उपसण्यासाठी झालेल्या खर्चाचा अपेक्षित लाभ नागरिकांना का झाला नाही, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, काँग्रेसचे गौस खतीब यांनी नदी गाळ उपसा कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी ठाकरे सेनेच्या तालुका संघटक सौ. अंकिता बेलोसे, उपशहरप्रमुख राजन निर्मळ, माजी नगरसेवक बशीर मुजावर, श्री. जसनाईक, बाबाराम विटमल, संदीप चव्हाण तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button