
कुवारबावातील गणेश कॉलनीत मध्यरात्री भीषण आग; तीन दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान
रत्नागिरी शहरालगतच्या कुवारबाव परिसरातील गणेश कॉलनी येथे रविवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून संबंधित व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री एका दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यानंतर आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत शेजारील दुकानांनाही आपल्या विळख्यात घेतले. या आगीत नारायण कृष्णा चव्हाण यांचे फर्निचर दुकान, गणेश सुरेश सागवेकर यांचे मोटारसायकल गॅरेज तसेच संकेत चंद्रकांत भुते यांचे महा-ई-सेवा केंद्र पूर्णतः भस्मसात झाले.
आगीमुळे फर्निचर, दुचाकी दुरुस्तीचे साहित्य, संगणक संच, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली. मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तीनही व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीने उभा केलेला व्यवसाय आणि मालमत्ता काही क्षणांत नष्ट झाल्याने संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नुकसानग्रस्त व्यावसायिकांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.




