
जनतेच्या हालअपेष्टांना सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता कारणीभूत, उध्दव ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांचा थेट आरोप
दापोलीः- दापोलीतील जनतेच्या वाढत्या मनस्तापाला थेट सत्ताधाऱ्यांनाच जबाबदार धरून ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. पन्नास वर्षानंतर तालुक्याला मंत्रीपद लाभले आहे, मात्र मंत्रीपद मिळण्याचा आणि जनतेला सुख सोयी मिळण्याचा दुरान्वये देखील संबंध नसतो. हे विदारक सत्य जनतेला पन्नास वर्षानंतर समजले आहे, अशा तिखट शब्दात गुजर यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
दापोली तालुक्यात पावसाच्या प्रत्येक सरीसोबत नागरिकांचे हाल वाढत असताना, त्यामागे नैसर्गिक आपत्तीपेक्षा सत्ताधाऱ्यांचा निष्काळजीपणाचा कारभार आणि प्रशासनावरील संपलेला वचक हेच खरे कारण असल्याचा घाणाघाती आरोप देखील गुजर यांनी केला आहे. आमसभा ही प्रशासनाला जबाबदार धरणारी लोकाभिमुख परंपराच बंद पाडल्याने संपूर्ण यंत्रणा सुस्तावली असून, पावसाळ्यापूर्वीचे नियोजन अक्षरशः कागदावरच राहिल्याचा दावा त्यांनी केली.
गुजर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दापोलीकरांनी मोठया विश्वासाने निवडून दिलेल्या आमदारांना राज्यात मंत्रीपदही मिळाले. मात्र सत्तेची ताकद जनतेच्या प्रश्नांसाठी वापरली जाण्याऐवजी प्रशासन मोकाट सुटल्याचे चित्र तालुकाभर दिसत आहे. पहिला जोरदार पाऊस पडताच रस्ते जलमय होणे, गटार तुंबणे, मोऱ्यांची अपुरी क्षमता उघड होणे, सार्वजनिक बांधकांची पोलखोल होणे आणि वीजपुरवठा विस्कळीत होणे, ही केवळ योगायोगांची मालिका नसून नियोजनशून्य कारभाराची साक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुर्वा होणाऱ्या आमसभांमध्ये प्रत्येक विभागाला जनतेसमोर हजर राहून उत्तर द्यावे लागत असे, अपूर्ण कामांचा जाब विचारला जात होता आणि अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा तसेच जनतेचा दबाव राहायचा. मात्र ही परंपरा थांबल्यापासून प्रशासनाची उत्तरदायित्वाची भावना लोप पावली असून, त्याची शिक्षा आज सामान्य दापोलीकरांना भोगावी लागत असल्याचा दावा त्यांनी केला. पावसाळा हा दरवर्षी अचानक येत नाही. तरीही प्रत्येक वर्षी त्याच त्या समस्या का उभ्या राहतात? गटारे वेळेत का साफ होत नाहीत? रस्त्यांची दुरूस्ती का होत नाही? धोकादायक ठिकाणांची पाहणी वेळेत का होत नाही? याची उत्तरे आता जनतेला हवी आहेत, असा सवालही गुजर यांनी उपस्थित केला आहे.
विकासाच्या घोषणा, निधीचे आकडे आणि उद्घाटनांच्या पलीकडे जाऊन प्रशासनाला प्रत्यक्ष कामाला लावण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी स्वीकारावी. अन्यथा पावसाचा प्रत्येक हंगाम हा दापोलीकरांसाठी संकटांचा आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा हंगाम ठरत राहील, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, गुजर यांनी केलेल्या या आरोपांवर संबंधित लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
फोटो डिपी 09-05 ऋषिकेश गुजर




