
मुसळधार पावसाने हर्णेतील राणेवाडी रस्ता खचला
दापोलीः- दापोली तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रस्ते वाहतुकीलाही बसू लागला असून, हर्णे येथील राणेवाडी परिसरातील मुख्य रस्ता खचल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताची शक्यता वाढल्याने नागरिकांनी तातडीने दुरूस्तीची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्याच्या कडेला मोठया प्रमाणात मातीची धूप झाली असून रस्त्याचा काही भाग खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहने चालविणे धोकादायक बनले आहे. या रस्त्यावरून दररोज ग्रामस्थांसह शालेय वाहने, दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहने मोठया प्रमाणावर ये-जा करतात. रस्ता खचल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या धोकादायक ठिकाणी तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना करून रस्त्याची दुरूस्ती करावी, तसेच वाहतुकीसाठी आवश्यक सूचना फलक व सुरक्षिततेची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
फोटो डिपी 09-01 हर्णे येथील राणेवाडीतील खचलेला रस्ता




