लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था रत्नागिरी जिल्हा संघटकपदी राजेश पाथरे


सामान्य नागरीकांची लूट आणि फसवणूकीला आळा घालण्यासाठी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य आता अधिक सक्रिय झाली आहे. ’जागो ग्राहक जागो’ या घोषणेखाली शोषणमुक्त व भ्रष्टाचारविरहित समाज घडविण्याचा निर्धार संस्थेने केला आहे. संस्थेने २४ प्रकारच्या तक्रारींसाठी नागरीकांना आवाहन केले आहे. या संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा संघटकपदी सेवानिवृत्त एसटी आगारप्रमुख राजेश बाळकृष्ण पाथरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नूतन पदाधिकार्‍यांत चिपळूण तालुका चिटणीसपदी संदीप कोलगे, संघटकपदी संजय रसाळ, सचिवपदी मनोजकुमार घाग अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. रेशन दुकानातील गैरव्यवहार, घरगुती गॅस सिलिंडरमधील फसवणूक, टॉकीज हॉलची मनमानी, अवैध दारू विक्री, वजन मापातील फसवेगिरी यासारख्या रोजच्या समस्यांवर संस्था दाद मागणार आहे. याशिवाय मोबाईल खरेदी-विक्री, वीज कंपनीची लूट, भेसळयुक्त अन्नपदार्थ, औषध विक्रेत्यांकडून फसवणूक, शाळा कॉलेजमधील डोनेशन, वकीलांचा हलगर्जीपणा, सोने-चांदी व्यवहार, रेल्वे एस्टी सेवा, डॉक्टरांचा निष्काळजीपणा यांसह जमीन खरेदीविक्रीतील फसवणूक सरकारी कार्यालयातील दिरंगाई आदी सर्व २४ विषयांवर तक्रारी स्वीकारल्या जातील. ग्राहक कायदा २०१९ अंतर्गत येणार्‍या सर्व विषयांवर नागरीकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करणार आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास नागरीकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. तक्रारींसाठी सद्या राजेश पाथरे, अ-१२ तेजकिरण किरण बिहार संकूल, बीकेजी रोड, चिपळूण या पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button