E20 पेट्रोलमुळं गाड्यांचं इंजिन खराब होतं? सोशल मीडियावरील ‘त्या’ १० अफवांवर केंद्र सरकारनं दिलं स्पष्टीकरण!

सोशल मीडियावरून ‘ई२०’ (E20) पेट्रोलबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांना आणि चुकीच्या माहितीला केंद्र सरकारनं आता पूर्णविराम दिला आहे.

ई२० पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन खराब होते, विम्याचे संरक्षण मिळत नाही आणि पर्यावरणाचं अतोनात नुकसान होतं, अशा अनेक दाव्यांचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात एक सविस्तर ‘१० मुद्द्यांचे स्पष्टीकरण’ जारी केलं असून, हे इंधन पूर्णपणे सुरक्षित आणि वैज्ञानिक निकषांवर आधारित असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रित करण्याचा हा कार्यक्रम शास्त्रीय संशोधन, आंतरराष्ट्रीय अनुभव आणि कडक नियामक मानकांवर आधारलेला आहे.

चला तर मग जाणून घेऊयात, सोशल मीडियावर व्हायरल होणारे ते १० मोठे गैरसमज आणि त्यामागचं नेमकं वास्तव काय आहे:

१. १ लीटर इथेनॉलसाठी १०,००० लीटर पाणी लागतं?

सत्य: एका लीटर इथेनॉलच्या निर्मितीसाठी तब्बल १० हजार लीटर पाणी खर्च होतं, हा दावा सरकारने पूर्णपणे फेटाळला आहे. देशाची अन्नसुरक्षा अबाधित ठेवून, गरजेपेक्षा जास्त असणाऱ्या अतिरिक्त तांदळाचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी केला जातो. शिवाय, आधुनिक इथेनॉल डिस्टिलरीजमध्ये प्रति लीटर केवळ ३ ते ५ लीटर प्रक्रिया केलेलं पाणी लागतं. बहुतांश कारखाने ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज’ (ZLD) प्रणालीवर काम करतात, ज्यामुळे पाण्याचा पुनर्वापर केला जातो.

२. मक्याच्या वापरामुळं पाण्याची टंचाई निर्माण होते?

सत्य: सध्या इथेनॉल निर्मितीमध्ये मक्याचा वाटा ४० टक्क्यांहून अधिक आहे. मक्याला भात शेतीच्या (धान) तुलनेत अत्यंत कमी पाणी लागतं. त्यामुळे पाण्याची बचत व्हावी, याच उद्देशाने सरकारने मक्याला अधिक हमीभाव (MSP) देऊन या पिकाला प्रोत्साहन दिलं आहे.

३. ई२० हे एक ‘असुरक्षित’ आणि ‘नवं’ इंधन आहे?

सत्य: ई२० हे प्रायोगिक तत्त्वावरील किंवा असुरक्षित इंधन नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या अनेक दशकांपासून याचा यशस्वी वापर केला जात आहे. अमेरिका, ब्राझील, कॅनडा, थायलंड, जपान आणि अनेक युरोपीय देशांमध्ये विविध प्रमाणात इथेनॉल मिश्रित इंधन मोठ्या प्रमाणावर वापरले जातं.

४. गाड्यांचं मायलेज आणि परफॉर्मन्स कमी होतो?

सत्य: ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’नं प्रवासी कारसाठी ४०,००० किमी आणि दुचाकी वाहनांसाठी २०,००० किमी अंतर पार करून याच्या चाचण्या घेतल्या आहेत. यामध्ये गाड्या चालवण्याच्या क्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम झालेला आढळलेला नाही. मायलेजमध्ये झालेला बदल अत्यंत ‘किरकोळ’ आहे. उलट, ई२० मुळे इंधनाचा ऑक्टेन रेटिंग वाढते, ज्याचा गाड्यांना फायदाच होतो.

५. इंजिन खराब होतं आणि गंज चढतो?

सत्य: ARAI, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम यांच्या संयुक्त संशोधनात असं दिसून आले आहे की, ई२० मुळे इंजिनच्या धातू किंवा प्लास्टिकच्या भागांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. केवळ अत्यंत जुन्या वाहनांमधील काही रबरी पार्ट्स वेळेपूर्वी बदलावे लागू शकतात.

७. पेट्रोलमध्ये ‘साखर’ असल्याने मुंग्या आणि मधमाश्या आकर्षित होतात?

सत्य: सोशल मीडियावरील हा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. इंधन दर्जाचे इथेनॉल तयार करताना डिस्टिलेशन (शुद्धीकरण) प्रक्रियेत सर्व साखर पूर्णपणे काढून टाकली जाते. तसंच, त्यात काही विशिष्ट रासायनिक घटक मिसळलं जातात, जे कीटक-मुंग्यांना दूर ठेवतात. शिवाय, पेट्रोलचा स्वतःचा उग्र वास या मिश्रणावर वरचढ असतो.

८. सुप्रीम कोर्टात सरकारनं याला ‘प्रयोग’ म्हटलं होतं?

सत्य: सरकारने सर्वोच्च न्यायालयात ई-२० कार्यक्रमाला कधीही ‘प्रयोग’ म्हटलेलं नाही. तो खटला केवळ इथेनॉल खरेदीच्या कंत्राटी अटींशी संबंधित होता, इंधनाच्या गुणवत्तेशी नाही. ॲटर्नी जनरल कार्यालयानेही यापूर्वीच मीडियातील अशा बातम्या चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले आहे.

९. पेट्रोलच्या टाकीत पाणी जमा होतं?

सत्य: आधुनिक वाहने आणि पेट्रोल पंपांवरील पायाभूत सुविधांमध्ये पाणी आत जाऊ नये, यासाठी विशेष आणि सुरक्षित तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे ई२० इंधनामुळे टाकीत पाणी जाण्याचा धोका नसतो. तसेच, उसाचा रस थेट पेट्रोलमध्ये मिसळल्याचे दाखवणारे व्हायरल व्हिडिओ पूर्णपणे बनावट (फेक) आहेत.

१०. पर्यावरणाला हानी पोहोचते?

सत्य: सर्व इथेनॉल प्रकल्पांना कायदेशीर पर्यावरण मंजुरी घेणे बंधनकारक आहे. या कार्यक्रमामुळे २०१४-१५ पासून आतापर्यंत देशाची तब्बल १.९ लाख कोटी रुपयांची परकीय चलन साठा बचत झाली आहे. शेतकऱ्यांना १.६ लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम अदा करण्यात आली असून, ९३० लाख मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे.

भारतानं वेळेआधीच गाठलं लक्ष्य!

पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१३-१४ मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण अवघे १.५ टक्के होते. मात्र, भारताने डिसेंबर २०२५ मध्येच निर्धारित वेळेपूर्वी २० टक्के इथेनॉल वितरणाचे (E20) उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. सध्या देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता २,००० कोटी लीटरवर पोहोचली असून, २०२५-२६ या पुरवठा वर्षात १,२०० कोटी लीटरपेक्षा जास्त इथेनॉल खरेदीचे नियोजन आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button