धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न ठरला जीवघेणा; संगमेश्वर रोड स्थानकावर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न एका ३३ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला. पाय घसरून फलाट आणि रेल्वेगाडीच्या मधील जागेत पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे शेंबवणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल बाळू बांबाडे (वय ३३, रा. शेंबवणे गोमाणेवाडी, ता. संगमेश्वर) हे मुंबईला जाण्यासाठी सावंतवाडी–दिवा एक्सप्रेस (गाडी क्र. १०१०६) पकडण्यासाठी संगमेश्वर रोड स्थानकावर आले होते. गुरुवारी (२ जुलै) दुपारी सुमारे १.४० वाजण्याच्या सुमारास गाडी सुटत असताना त्यांनी धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा तोल जाऊन पाय घसरल्याने ते फलाट आणि रेल्वेगाडीच्या मधील जागेत पडले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर रेल्वे पोलीस शिपाई बुरकुले यांनी तातडीने अनिल यांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच दुपारी सुमारे ३.४० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवघरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

अनिल बांबाडे हे मुंबईतील एका खासगी कंपनीत कार्यरत होते आणि कुटुंबाचा प्रमुख आर्थिक आधार होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे बांबाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शेंबवणे परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, धावत्या रेल्वेत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न टाळावा, अशा प्रकारचे जीवघेणे धाडस करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button