
प्रिन्स विल्यम यांनी सौरव गांगुलीबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी रोखली वाहतूक, रहाणे-लारा पण उपस्थित;
Prince William Plays Cricket Buckingham Palace Sourav Ganguly : लंडनमध्ये प्रसिद्ध अशा बकिंगहॅम पॅलेस परिसरातील मॉल रोड परिसरात प्रिन्स विल्यम क्रिकेट खेळत असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली.
प्रिन्स विल्यम यांच्या बरोबरीने जो रुट, अजिंक्य रहाणे, ब्रायन लारा, सौरव गांगुली, जे्स अँडरसन हे खेळाडू सहभागी झाले होते. पुढच्या महिन्यात मुंबईत होणाऱ्या अर्थशॉट प्राईज अवॉर्ड्स सेरेमनी सोहळा पुढच्या महिन्यात मुंबईत होणार आहे. त्याचं काऊंटडाऊन या सामन्याद्वारे सुरू झालं. भारत आणि ब्रिटन यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध दृढ करण्यादृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बॅकयार्ड क्रिकेट बॉईज यांच्यातर्फे या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
प्रिन्स विल्यम सेंट जेम्स पॅलेसच्या प्रवेशद्वारातून आले. त्यांनी सहभागी सर्व खेळाडूंची भेट घेतली. सौरव गांगुलीच्या गोलंदाजीवर त्यांनी षटकार लगावला. त्यानंतर त्यांनी गोलंदाजीही केली. जगात अनेक निसर्गरम्य मैदानं आहेत. पण बकिंगहॅम पॅलेसच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट खेळण्याचा अनुभव अनोखा होता. प्रिन्स विल्यम हे प्रामुख्याने फलंदाज वाटतात असं जो रूट म्हणाला.
त्यांनी चांगली फलंदाजी केली. अनेक चांगले फटके खेळले. ब्रायन लारानेही प्रिन्स विल्यम यांच्या फलंदाजीचं कौतुक केलं. त्यांना फुटबॉल खूप आवडतं. क्रिकेटविषयी कमी माहिती आहे असं ते म्हणाले. पण ते खरं नाही. त्यांच्या गोलंदाजीत सुधारणा होऊ शकते. पण त्यांची फलंदाजी उत्तम आहे. मी त्यांना सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदीजीला पाठवेन.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने प्रिन्स यांच्या नम्र स्वभावाबाद्दल अप्रूप व्यक्त केलं. ते उदार व्यक्तिमत्वाचे आहेत. हसतखेळत आम्ही क्रिकेट खेळलो. त्यांचं भारतात जोरदार स्वागत होईल असं गांगुली म्हणाला.
अर्थशॉट प्राईज पुरस्कार काय आहेत?
२०२० मध्ये प्रिन्स विल्यम यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी अभ्यासपूर्ण संशोधन करणाऱ्या पाच विजेत्यांना गौरवण्यात येतं. यंदाच्या वर्षी पाच विविध श्रेणीत मिळून १५ जणांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत.




