अनाम प्रेम परिवारातर्फे परिचारिकांचा सन्मान

कर्करोगाशी झुंज देणाऱ्या सुनीता पवार यांचा विशेष गौरव; उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयाकडून मिळतोय मदतीचा आधार

रत्नागिरी : नवरात्रीचे औचित्य साधून अनाम प्रेम परिवाराच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथील अधिसेविका आणि परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. सौ. स्वरूपा सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी हा कार्यक्रम पार पडला. आरोग्य क्षेत्रात रुग्णसेवेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या परिचारिकांचा गौरव करण्याबरोबरच, कर्करोगाशी जिद्दीने लढा देणाऱ्या श्रीमती सुनीता केशव पवार यांचा विशेष सन्मान करून त्यांच्या संघर्षाला आणि जगण्याच्या जिद्दीला सलाम करण्यात आला.

संघर्षाला जिद्दीची साथ; माणुसकीच्या हातांचा आधार!

आयुष्याच्या प्रवासात कधी कधी नियती अशी परीक्षा घेते की, प्रत्येक दिवस संघर्षाचा आणि प्रत्येक श्वास जगण्याच्या इच्छेचा बनून जातो. सुनीता केशव पवार यांचा प्रवासही असाच संघर्षमय आहे. वयाच्या ५८व्या वर्षी त्यांना जिभेच्या आणि थायरॉईडच्या कर्करोगाचा सामना करावा लागत आहे. सन २०२४ पासून सुरू असलेल्या या लढ्यात आर्थिक, शारीरिक आणि मानसिक अशा अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. टाटा हॉस्पिटल, खारघर येथे उपचार घेत असतानाही त्यांनी जगण्याची उमेद आणि मनातील आशेचा दिवा विझू दिलेला नाही.

या कठीण काळात श्री. दिनकर कांबळे यांनी माणुसकीच्या भावनेतून सुनीता पवार यांना मोलाची मदत केली. रत्नागिरीहून मुंबईला उपचारांसाठी जाण्यापासून ते उपचारांची व्यवस्था करण्यापर्यंत त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला. त्यानंतर सन २०२५ मध्ये सुनीता पवार जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी आल्या असताना, त्यांना उद्योगमंत्री तथा पालकमंत्री श्री. उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात मदतीसाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला.

संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांना आवश्यक ती मदत मिळेल, असा विश्वास देण्यात आला. गेल्या वर्षभरापासून आजपर्यंत या कार्यालयाकडून त्यांना वेळोवेळी मदतीचा हात आणि मायेचा आधार मिळत आहे. संकटाच्या अंधारात आशेचा किरण दिसावा, निराशेच्या क्षणी कुणीतरी आपलेपणाने पाठीवर हात ठेवावा आणि ‘तुम्ही एकट्या नाही आहात’ असा विश्वास द्यावा, यापेक्षा मोठे बळ दुसरे कोणते असू शकते?

आजाराशी लढताना औषधोपचार जितके महत्त्वाचे असतात, तितकीच मानसिक उभारी आणि माणुसकीची साथही महत्त्वाची असते. सुनीता पवार यांच्या संघर्षात त्यांना मिळालेला आधार हा केवळ मदतीचा हात नसून, त्यांच्या जगण्याच्या आशेला नवी ऊर्जा देणारा ठरला आहे. त्यांच्या या जिद्दीचा गौरव करत अनाम प्रेम परिवाराने त्यांचा विशेष सन्मान केला.

परिचारिकांच्या सेवाभावी कार्याचा गौरव

रुग्णालयात रुग्णांची काळजी घेण्यापासून ते त्यांच्या उपचार प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावण्यापर्यंत परिचारिकांचे योगदान अत्यंत मोलाचे असते. रुग्णांना शारीरिक उपचारांसोबतच मानसिक आधार देण्याचे कामही त्या सातत्याने करत असतात. आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असलेल्या या परिचारिकांच्या कार्याची दखल घेत अधिसेविका श्रीम. शिल्पा घाटगे, प्राचार्या नर्सिंग स्कुल श्रीम. श्रृती आंबेकर, PHN श्रीम. माया सावंत, श्रीम. श्रृती जाधव, श्रीम. निलम मयेकर, परिपाठ्यनिर्देशिका श्रीम. मिनाक्षी दळवी, श्रीम. मेदीनी तांबे, परिसेविका श्रीम. संध्या सप्रे, वेशाली पवार, तन्वी रामपुरकर, अधिपरिचारीका श्रीम. निधी पेडणेकर, प्राजक्ता जाक्कर, वर्षा डिचोलकर, सुचिता पांचाळ या महिलांचा सन्मान करण्यात आला.

‘आपण ज्या समाजात वावरतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो,’ या भावनेतून अनाम प्रेम परिवार विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो. सामाजिक बांधिलकी जपत गरजू व्यक्तींना आधार देणे, समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे आणि माणुसकीची भावना जिवंत ठेवणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे

या कार्यक्रमाला सौ. स्वरूपा सामंत, डॉ. जिज्ञासा भाट्ये, डॉ. अंकुश शिरसाट, डॉ. ज्ञानेश व्हीटेकर, ज्योती गराटे, सुचेता पाटील, समीक्षा कामत, भाग्यश्री सिनकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. हर्षदा गावडे, सौ. श्रद्धा मोरे, पंचायत समिती सदस्य सौ. विद्या बोंबले, डॉ. पद्मजा कांबळे, नगरसेवक सोहेल मुकादम, मेट्रन सौ. शिल्पा घाटगे, शहर विभागप्रमुख मनोज साळवी ,आरोग्य सल्लागार सनियंत्रण समितीच्या सदस्य अभिजीत दुड्ये, सौ. संपदा तळेकर, श्री. सागर भिंगारे, युवासेनेचे अथांग कदम आणि युवराज शेट्ये आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रथमेश साळवी यांनी केले.

माणुसकीची खरी श्रीमंती संपत्तीत नसते, तर संकटाच्या काळात दुसऱ्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या हातांत असते. नवरात्रीच्या नारीशक्तीच्या उत्सवात परिचारिकांच्या सेवाभावी कार्याचा सन्मान करतानाच सुनीता पवार यांच्या संघर्षमय प्रवासाला मिळालेल्या माणुसकीच्या आधाराचा गौरव करण्यात आला. त्यांच्या जगण्याच्या जिद्दीला अनाम प्रेम परिवाराचा सलाम!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button