‘हा निसर्गाचा कोप; दुष्काळाचा सामना सर्वांनी एकजुटीने करूया!’

आमदार प्रमोद जठार यांचे आवाहन; राजापूर तालुक्यातील पाणीटंचाईचा घेतला आढावा, तातडीने आराखडा तयार करण्याच्या सूचना



राजापूर : तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी तालुक्यातील पाण्याची उपलब्धता, संभाव्य पाणीटंचाई आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी तालुक्याचा सविस्तर पाणीटंचाई आराखडा तातडीने तयार करावा, अशा सूचना आमदार जठार यांनी प्रशासनाला दिल्या.
या बैठकीत तहसीलदार विकास गंबरे यांच्याकडून तालुक्यातील सद्यस्थितीची माहिती घेण्यात आली. उपलब्ध धरणांमधील पाणीसाठ्याचा काटेकोरपणे आणि योग्य नियोजन करून वापर करणे आवश्यक असल्याचे आमदार जठार यांनी सांगितले. तसेच संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन गावनिहाय पाण्याची गरज आणि उपलब्ध जलस्रोतांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला.
पाणीटंचाईच्या काळात विंधन विहिरी, धरणांचे कालवे आणि अन्य उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे, अशा गावांसाठी पर्यायी जलस्रोत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘दुष्काळाच्या प्रश्नात राजकारण आणू नका’
‘हा निसर्गाचा कोप आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी एकजुटीने दुष्काळाचा सामना करण्याची गरज आहे. दुष्काळाच्या प्रश्नात राजकारण किंवा पक्ष आणू नका. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,’ असे आवाहन आमदार प्रमोद जठार यांनी केले.
दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घ्यावा, ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि त्या प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पाणीटंचाई निवारणासाठी नियोजनावर भर
राजापूर तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन, पाणीपुरवठ्याच्या पर्यायी व्यवस्था आणि आवश्यक ठिकाणी नवीन जलस्रोत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणीटंचाई आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.
यावेळी राजापूर पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव, राजापूर पूर्व मंडल अध्यक्ष एकनाथ मोंडे, राजापूर पश्चिम मंडल अध्यक्ष मोहन घुमे, सरचिटणीस अमोल सिनकर, सुरेश गुरव, फारुख साखरकर, प्रल्हाद तावडे, चंद्रकांत लिंगायत, काशिनाथ पाटील, संतोष धुरत, भूषण सावंत, अजय लाड, राजापूरच्या नगरसेविका सुयोगा जठार, शितल पटेल, मारुती कांबळे, सुधा चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button