बनावट टूर कंपनीच्या आमिषाला बळी; तुर्की सहलीच्या नावाखाली रत्नागिरीतील दोन महिलांची १२.४० लाखांची फसवणूक


रत्नागिरी : परदेश सहलीचे आकर्षक आमिष दाखवून रत्नागिरीतील दोन महिलांची तब्बल १२ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘मेक माय टूरएक्स’ (Make My Tourx) या नावाने टूर कंपनी चालवत तुर्की-इस्तांबुल सहलीचे आश्वासन देण्यात आले. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतर ना सहलीचे आयोजन करण्यात आले, ना पैसे परत करण्यात आले. याप्रकरणी दिल्लीतील रोहिणी येथील संदीप कुमार याच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०२४ ते ११ जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. फिर्यादी महिला मयेकर यांनी आपल्या मैत्रिणीसह संबंधित टूर कंपनीशी संपर्क साधला होता. आरोपीने परदेश सहलीसाठी आवश्यक कागदपत्रे, व्हिसा प्रक्रिया आणि प्रवासाचे नियोजन करून देण्याचे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन केला.

यानंतर फिर्यादींकडून ५ लाख रुपये, तर त्यांच्या मैत्रिणी वैभवी खेडेकर यांच्या कुटुंबाकडून ७ लाख ४० हजार रुपये अशा एकूण १२ लाख ४० हजार रुपयांची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेण्यात आली.

मात्र, संपूर्ण रक्कम स्वीकारल्यानंतरही आरोपीने सहलीचे कोणतेही नियोजन केले नाही. वारंवार संपर्क साधूनही टाळाटाळ करण्यात आली आणि भरलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर मयेकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, ऑनलाइन किंवा सोशल मीडियावरील आकर्षक टूर पॅकेजच्या जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित कंपनीची नोंदणी, कार्यालयाचा पत्ता, ग्राहकांचे अभिप्राय आणि अधिकृत कागदपत्रांची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button