जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध; युरियाचा ५५० मे. टन आरक्षित साठा विक्रीसाठी खुला


​रत्नागिरी, दि. ३० )- चालू खरीप हंगामाच्या प्रगतीपथावर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मुबलक प्रमाणात आणि वेळेवर खत साठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. जिल्ह्यात सध्या विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, शेतकर्‍यांनी खतटंचाईबाबत कोणतीही चिंता करू नये, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. खरीप हंगामामध्ये शेतकर्‍यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार खते उपलब्ध होणार आहेत.
​जिल्ह्यासाठी खरीप हंगाम २०२६ करीता एकूण १२ हजार ५५० मेट्रिक टन विविध प्रकारच्या खतांचे आवंटन मंजूर झाले होते. या मंजूर कोट्यापैकी आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार ७३९ मेट्रिक टन खतांचा पुरवठा पूर्ण झाला असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ५२७.६६ मेट्रिक टन खत साठा शिल्लक आहे.
​या खत पुरवठ्याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी सांगितले की, “जिल्ह्यामध्ये आजअखेर पाच रेल्वे रेक आणि रस्ते वाहतुकीद्वारे केवळ युरियाचाच ५ हजार ९१६ मेट्रिक टन पुरवठा झाला आहे, जो एकूण मंजूर आवटनाच्या जवळपास ९०% आहे. याव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची खते मिळून २ हजार ८२३ मेट्रिक टन पुरवठा झाला आहे. तसेच आगामी काळात सहाव्या रेल्वे रेकद्वारे आवश्यकतेनुसार अधिक खतांचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी खत उपलब्धतेबाबत पूर्णपणे निश्चित राहावे.”
​संरक्षित (बफर) साठा विक्रीसाठी खुला
सध्याच्या पेरणीच्या हंगामात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना युरिया मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कृषी विभागाने तत्परता दाखवली आहे. पालकमंत्री महोदय आणि जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनानुसार व निर्देशानुसार जिल्ह्यातील २३ गोदामांमध्ये ठेवलेल्या युरियाच्या एकूण ६४० मेट्रिक टन आरक्षित (बफर) साठ्यापैकी शेतकर्‍यांची गरज लक्षात घेऊन आज अखेर दोन टप्प्यांमध्ये ५५० मेट्रिक टन युरियाचा साठा विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे ऐन गरजेच्या वेळी शेतकर्‍यांना युरिया खत सहज उपलब्ध झाले आहे.
​खतांच्या संतुलित वापराचे आवाहन
पिकांच्या निरोगी वाढीसाठी आणि जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा विशेषतः युरियाचा अतिवापर टाळावा. शेतकर्‍यांनी पिकांना आवश्यकतेनुसार खतांच्या संतुलित मात्रांमध्येच वापर करावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सदाफुले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button