तपासणी करताना केवळ मोठे हॉटेल व्यावसायिकच टार्गेट नको

अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या संवाद मार्गदर्शन कार्यक्रमात हॉटेल व्यावसायिकांची मागणी

रत्नागिरी
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून हॉटेल व्यावसायिकांसाठी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येईल. मात्र, तपासणी आणि कारवाई करताना केवळ मोठे हॉटेल व्यावसायिक टार्गेट न करता सरसकट सर्व छोटे आणि मोठे व्यावसायिक यांच्यावर कारवाई किंवा तपासणी अपेक्षित असल्याची मागणी रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिकांनी केली. यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शासन आदेश सर्वांना लागू असून तपासणी सर्वांची होणार असल्याचे सांगितले.

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागानं लागू केलेल्या नव्या नियमावली बाबत शहरातील हॉटेल व्यावसायिकांची जागृती करण्याबाबत येथील लँडमार्क हॉटेलच्या हॉलमध्ये संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तृप्ती घरत, संकेत कोनरी, ज्ञानेश्वर आटपाडकर, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, उदय लोध यांच्यासह शहर आणि परिसरातील हॉटेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तृप्ती घरत यांनी राज्य शासनाकडून जारी करण्यात आलेली नियमावली समजावून सांगितली. वर्तमान पत्रातून अन्न वितरणावर 5 जून पासून पूर्णतः बंदी आहे. पार्सल सेवेसाठी बटर पेपर किंवा कंटेनर हेच पर्याय आहेत. प्रत्येक व्यावसायिकाने पिण्याचे मोफत आणि सुरक्षित पाणी ग्राहकांना पुरवले पाहिजे. कोणताही छोटा अथवा मोठा व्यावसायिक बॉटल मधील पाणी विकत घेण्याची सक्ती करू शकत नाही. यासाठी प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी मोफत पिण्यायोग्य पाणी उपलब्ध असल्याचा बोर्ड लावणे बंधनकारक असणार आहे. तसेच सहा महिन्यातून एकदा पाणी तपासणी करून घेणे देखील बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच तेलाचा पुनर्वापर करण्यावर देखील बंदी आहे. खराब झालेल्या तेलाचा बायो डिझेलसाठी वापर करता येऊ शकतो. त्या दृष्टीनं व्यावसायिक यांनी नियोजन कराव असे तृप्ती घरत म्हणाल्या. मेनू कार्डवर देखील पारदर्शक माहिती असणे आवश्यक आहे. वेज आणि नॉन वेज विभाग स्वतंत्र असणे आवश्यक असणार आहे. सहा महिन्यातून एकदा पेस्ट कंट्रोल करणे देखील बंधनकारक असून मेडिकल मधून औषध आणून पेस्ट कंट्रोल करणे चुकीचे असून अधिकृत दिलेल्या यंत्रणे मार्फतच पेस्ट कंट्रोल करून घेणे बांधकारक असणार आहे.

या नियमांचा भंग केल्यास कारवाईची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. असुरक्षित अन्न पुरवल्यास आणि यातून मृत्यू झाल्यास सात वर्ष जन्मठेप आणि 10 लाखांचा दंड, विना परवाना व्यवसाय चालवल्यास 10 लाखांचा दंड. व्यवसायाच्या ठिकाणी अस्वच्छता असल्यास 1 लाखांचा दंड. दंड करूनही वारंवार याच चुका दिसून आल्यास परवाना निलंबन आणि दुप्पट दंड करण्यात येईल असे तृप्ती घरत यांनी सांगितले.

यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी देखील अन्न व औषध विभागाकडून देण्यात आलेली नियमावली लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सहमती दर्शवली. मात्र तपासणी करताना केवळ मोठ्या व्यावसायिकांवर तपासणीचा बडगा नको. अनधिकृत आणि छोटे हातगाडीवाले यांची देखील कठोर तपासणी व्हायला हवी अशी मागणी केली. अनेक हातगाडी चालकांकडे लायसेन्स नाही, अधिकृत सिलेंडर आणि वीज जोडणी नाही त्यांच्यावर देखील कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. यावर हा आदेश सर्वांना लागू असून तपासणी आणि कारवाई करताना भेदभाव होणार नसल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button