
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे उत्साहात उद्घाटन
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जन आरोग्य समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश साळवी यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला.
यावेळी जन आरोग्य समिती सदस्य अमित पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार, डॉ. ऋषिकेश डोके, आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर, आरोग्य निरीक्षक संजय बारिंगे, एलएचव्ही सीमा पाडवी, सीएचओ मनाली तारवे, एएनएम स्वानंदी पवार तसेच फार्मासिस्ट आस्वाद यादव उपस्थित होते.
मोहिमेची पाहणी करण्यासाठी जिल्हास्तरावरून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. ठाकूर, डीटीटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काठोळे तसेच जिल्हा प्रसार व माध्यम अधिकारी श्री. बेंडकुळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या कार्यक्षेत्रात 23 पोलिओ बूथ उभारण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून 900 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस पाजण्यात आले. लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांनी परिश्रम घेतले. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या बालकांना पोलिओचे डोस पाजून मोहिमेला मोलाचे सहकार्य केले.




