गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लवकरच ‘रोबोटिक वॉटर रेस्क्यू क्राफ्ट’ची शक्यता


गणपतीपुळे : राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक ‘रोबोटिक वॉटर रेस्क्यू क्राफ्ट’ यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर केला असून, या यंत्रणेच्या माध्यमातून समुद्रातील दुर्घटनांमध्ये जीवितहानी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अलीकडेच गणपतीपुळे समुद्रकिनारी छत्रपती संभाजीनगर येथील पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची गरज अधोरेखित झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बचावकार्य अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी हा प्रस्ताव मांडला आहे.

प्रस्तावित रोबोटिक वॉटर रेस्क्यू क्राफ्ट रिमोटद्वारे नियंत्रित केले जाते. समुद्रात एखादी व्यक्ती अडचणीत असल्याचे लक्षात येताच हे यंत्र काही क्षणांत त्या ठिकाणी पोहोचून संबंधित व्यक्तीला आधार देत सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणू शकते. त्यामुळे बचावकार्याचा वेग वाढण्याबरोबरच बचाव पथकाच्या सदस्यांच्या जीवितालाही धोका कमी होणार आहे.

ही यंत्रणा एका प्रौढ व्यक्तीचे वजन सहज पेलण्यास सक्षम असून, उंच लाटा, खराब हवामान आणि प्रतिकूल समुद्री परिस्थितीतही प्रभावीपणे कार्य करू शकते. त्यामुळे गणपतीपुळेसारख्या गर्दीच्या पर्यटनस्थळी ती अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे म्हणाले, “बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत काही सेकंदांत पोहोचून तिला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्याची क्षमता या रोबोटमध्ये आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरेल.”

दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेतल्यास गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील बचाव व्यवस्थेत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button