दादर-रत्नागिरी पॅसेंजरचा प्रश्न रखडला; रेल्वेमंत्र्यांच्या निर्देशांनंतरही हालचाल नाही


रत्नागिरी : कोकणवासीयांच्या दैनंदिन प्रवासासाठी महत्त्वाची मानली जाणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा पूर्ववत सुरू करण्याचा प्रश्न अद्यापही अनिश्चिततेत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एप्रिल महिन्यात या गाडीच्या पुनर्सुरुवातीसंदर्भात कार्यकारी व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिले होते. मात्र, दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही या संदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने प्रवासी संघटना आणि कोकणातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोना काळात बंद करण्यात आलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा नंतर ‘दिवा-रत्नागिरी पॅसेंजर’ या स्वरूपात सुरू करण्यात आली. त्यामुळे मुंबई शहरातील प्रवाशांना दादरपर्यंत थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. ही सेवा पूर्ववत दादर येथून सुरू करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे.

दरम्यान, दादर स्थानकावर जागेअभावी ही सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे कारण प्रशासनाकडून दिले जात असताना, उत्तर भारताकडे धावणाऱ्या काही रेल्वे सेवांना मात्र कायमस्वरूपी मंजुरी देण्यात आल्याने प्रवासी संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यानंतर वाढलेल्या जनदबावामुळे रेल्वेमंत्र्यांनी या विषयाची दखल घेतली होती.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितले की, दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेशी सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. गाडी कोकण रेल्वेच्या हद्दीत चालवण्यास कोणतीही अडचण नसून हा विषय मुख्यत्वे मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्राशी संबंधित आहे.

दुसरीकडे, कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र व कोकणातील रेल्वे सेवांबाबत दुजाभाव होत असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित प्रशासनाने प्रवाशांच्या भावना आणि गरजा लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

कोकणातील हजारो चाकरमानी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी ही रेल्वे सेवा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासन नेमका कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button