
‘रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सव’ उत्साहातरानभाज्या ३६५ दिवस उपलब्ध होण्यासाठी कृषी विद्यापीठाने संशोधन करावे; प्रकल्पाला निधी देणार – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १४ ): आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असलेल्या रानभाज्या केवळ पावसाळ्यापुरत्या मर्यादित न राहता, त्या वर्षाचे ३६५ दिवस, बाराही महिने सर्वसामान्यांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विशेष संशोधन करावे. या प्रकल्पासाठी आवश्यक तो सर्व निधी दिला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज येथे केली. तसेच, पुढच्या वर्षापासून महिलांना रानभाजी आणि तृणधान्यांवर आधारित खास उपाहारगृह चालविण्यास देण्याची अभिनव संकल्पनाही त्यांनी मांडली.


कृषी विभाग आणि ‘आत्मा’ यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील हॉटेल विवेक देसाई बँक्वेट येथे आयोजित ‘जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सव २०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या उद्घाटन सोहळ्याला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, कृषी सभापती महेश नाटेकर, शिक्षण सभापती नंदकुमार मूरकर, महिला व बाल कल्याण सभापती मयुरी शिर्के, समाज कल्याण सभापती सुयोग कांबळे, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, उपसभापती गजानन नलावडे आणि नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आदी उपस्थित होते.
महोत्सवात महिलांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांची चव देशात इतरत्र कुठेही मिळणार नाही, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी महिलांचे कौतुक केले. केवळ महोत्सवापुरते मर्यादित न राहता, पुढच्या वर्षी या महिलांना सलग आठ दिवस रानभाजी व पौष्टिक तृणधान्यांवर आधारित जेवण देणारे उपाहारगृह चालविण्यास देण्याचा प्रयोग राबविणार असल्याचे ते म्हणाले.
रानभाज्यांचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्टॉलवर पाहणी करताना एका रानभाजीत चक्क ‘साखर’ (मधुमेह) नियंत्रित करण्याची ताकद असल्याचे एका महिलेने सांगितले. अशा भाज्यांवर प्रक्रिया करून त्या वर्षभर टिकवण्यावर विद्यापीठाने भर द्यावा, असे सांगून पालकमंत्री डाॕ सामंत म्हणाले, शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर विसंबून न राहता गटशेतीकडे वळले पाहिजे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आदर्श घेतला पाहिजे.
या महोत्सवात पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील कृषी पुरस्कार प्राप्त सहा शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भात शेती (जिल्हास्तरीय पीक स्पर्धा): नागेश बने (प्रथम क्रमांक) आणि संजय पाटोळे (द्वितीय क्रमांक). नाचणी पीक: धाकटू गावकर (प्रथम क्रमांक) यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
‘सिंधुरत्न समृद्ध योजने’अंतर्गत आंबा बागायतदारांना मालवाहतुकीसाठी अनुदानाचे वाटपही करण्यात आले. तत्पूर्वी, पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सर्व स्टॉल्सना भेट देऊन महिलांनी बनविलेल्या पदार्थांची आणि विक्रीसाठी आलेल्या रानभाज्यांची आस्थेने माहिती घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी सविस्तरपणे केले. तर ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय बेतीवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या महोत्सवाला जिल्ह्यातील शेतकरी, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




