शेखर निकम यांना मंत्रिमंडळात स्थान द्या; अल्पसंख्याक सेलची सुनील तटकरे यांच्याकडे मागणी

चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांचा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी तटकरे यांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चिपळूण येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संघटनात्मक चर्चा केली. यावेळी अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. या बैठकीत जाकीर शेकासन यांनी कोकणच्या विकासाच्या दृष्टीने आमदार शेखर निकम यांना मंत्रिपद देण्याची मागणी केली.

निवेदनात शेखर निकम हे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक आणि मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पूरपरिस्थिती, कोरोना काळ तसेच विविध स्थानिक प्रश्नांमध्ये त्यांनी जनतेच्या समस्या मांडल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अल्पसंख्याक समाजाचा विश्वास असल्याचा दावा

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा असून, शेखर निकम हे सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांना मंत्रिपद दिल्यास अल्पसंख्याक समाजात पक्षाबाबत सकारात्मक संदेश जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

कोकणात पक्ष संघटन मजबूत करण्याची मागणी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्यास कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नव्या ऊर्जेची गरज असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

स्व. अजितदादा पवार यांचे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर विशेष प्रेम होते आणि त्यांनी शेखर निकम यांच्या कामाचे कौतुक केले होते, असा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. त्यांच्या इच्छेची पूर्तता करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, चिपळूण तालुकाध्यक्ष अबू ठसाळे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष इमाम शहा, चिपळूण शहर उपाध्यक्ष सलीम पालोजी, सोहेल परकार, नगरसेविका शहानाज वांगडे, लतीफ परकार, शकील सुर्वे, खालिद पटाईत, अमजद काझी आदी उपस्थित होते.

दरम्यान, सुनील तटकरे यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शेखर निकम यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरून पुढे आली असून, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button