पाण्यावरून पाकिस्तानचा भारताविरोधात युद्धाचा इशारा; सिंधू करारावरून आक्रमक भूमिका!

इस्लामाबाद : पाणी हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून त्याला धोका निर्माण करणार्‍या देशाविरोधात युद्धाशिवाय पर्याय राहणार नाही, असे सांगत पाकिस्तानने सिंधू पाणी करारावरून भारताला युद्धाचा थेट इशारा दिला आहे.

मागील वर्षी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार संपुष्टात आणण्याची घोषणा केली. यामुळे सध्या पाकिस्तानातील एक तृतीयांश लोकसंख्येला त्यातही प्रामुख्याने सिंध आणि बलुचिस्तान प्रांताला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सिंधू खोर्‍यातून पाकिस्तानला ८० टक्के पाणी मिळत असून त्याच पाण्यावर ८० टक्के जमिनीवर केल्या जाणार्‍या शेतीलाही मोठा फटका बसला आहे.

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारत हा पाण्याचा शस्त्रासारखा उपयोग करत आहे. त्यामुळे पाकिस्तानात वाहणार्‍या चेनाब नदीचा प्रवाहाला आता अडथळा आला आहे. पाकिस्तानने भारतातील या नदीलगत विविध ठिकाणी सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांचे निरीक्षण केले आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत ११५ ठिकाणांची पाहणी झाली असली तरी एक वर्ष कालावधीतील अद्ययावत माहिती अजून मिळालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

पाणी रोखण्यासाठी भारताचे वेगाने प्रयत्न सुरू असल्याचे ठोस पुरावे आल्यावरच पाकिस्तान आक्रमक पावले उचलणार आहे, असे आसिफ यांनी सांगितले. भारताचे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी पाकिस्तानात जाणार्‍या नदीचे पाणी २०२८ पर्यंत पूर्णपणे थांबवण्यात येणार असल्याचे नुकतेच संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ख्वाजा आसिफ यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button