
दापोली कृषी विद्यापिठाला ८६ कोटी, विद्यापीठाच्या विविध प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनान घेतला आहे. विद्यापीठाच्या विविध प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देत सुमारे ८६ कोटी रुपयांच्या विकासकामांचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांना आधुनिक वसतिगृह सुविधा उपलब्ध होणार असून शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थाही अधिक सक्षम होणार आहे. कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या प्रयत्नाला व कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या पाठपुराव्याला हे यश आल्याचे बोलले जात आहे.
विद्यापीठ प्रशासनाने वाढती विद्यार्थी संख्या, अपुरी निवास व्यवस्था आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन कृषी परिषदेमार्फत अनेक बांधकामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. कृषी परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्यानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
www.konkantoday.com




