
’मन की बात’मध्ये हापूसचा गोडवा! पंतप्रधान मोदींनी केले कौतूक
उन्हाळा सुरू झाला की, भारतातील प्रत्येक घरात चर्चा रंगते ती म्हणजे फळांचा राजा आंब्याची. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ’मन की बात’ या कार्यक्रमाच्या १३४ व्या भागात भारतातील आंब्याच्या विविध जाती आणि संस्कृतीचा विशेष गौरव केला, यामध्ये त्यांनी महाराष्ट्राची शान आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गची ओळख असलेल्या हापूस आंब्याचा प्रामुख्याने उल्लेख केला. यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील आंबा उत्पादक आणि रत्नागिरीकरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आपल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतातील प्रत्येक भागाची स्वतःची अशी एक वेगळी वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक परिसराचा स्वतःचा आंबा, स्वतःची चव आणि स्वतःचा सुगंध आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आणि कोकणचा हापूस ’अल्फान्सो’ असा उल्लेख करत हापूस आब्याचे विशेष कौतुक केले. यासोबतच त्यांनी गुजरातचा केशर, उत्तर प्रदेशचा दशहरी, काशीचा लंगडा आणि बिहारच्या जर्दाळू आंब्याचाही उल्लेख केला आंबा बदलला की त्याचे रूप, पंतप्रधानांनी यावेळी केवळ आंब्याच्या चवीचेच कौतुक केले नाही, तर त्याच्या आर्थिक महत्त्वावरही प्रकाश टाकला. आंब्याचा हा प्रवास आता गावाकडून थेट जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचला आहे, असे मोदीनी अभिमानाने सांगितले.
रंग आणि चव कशी बदलते, हे सांगताना त्यानी दक्षिण भारतातील बंगनपल्ली, तोतापुरी आणि बंगालच्या हिमसागर आंब्याचेही दाखले दिले. रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणात पिकणारा हापूस आंबा हा आपल्या उत्कृष्ट चवीमुळे आणि सुगंधामुळे जगभरात निर्यात केला जातो. यामुळे देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेला मोठी ताकद मिळत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.www.konkantoday.com




