
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन सतर्क; दरडग्रस्त कुटुंबांशी संवाद, स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात
राजापूर : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन, जमीन खचणे आणि जमिनीला भेगा पडणे यांसारख्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन राजापूर महसूल प्रशासनाने पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. तहसीलदार विकास गंबरे यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकींतून संभाव्य आपद्ग्रस्त कुटुंबांशी संवाद साधला जात असून, अतिवृष्टीच्या काळात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महसूल प्रशासनाकडून संभाव्य धोक्याच्या क्षेत्रांतील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने नोटिसा बजावण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून वेळेवर सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राजापूर तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून, यापूर्वी काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी वडदहसोळ येथे डोंगराचा मोठा भाग कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच महाळुंगे आणि धोपेश्वर येथेही डोंगराला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने या परिसरांचा समावेश दरडप्रवण क्षेत्रामध्ये केला जातो.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संभाव्य धोक्याच्या गावांमधील कुटुंबांशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. अतिवृष्टीच्या काळात स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षितता लक्षात घेऊन तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
या मोहिमेत धोपेश्वर येथील खंडेवाडी, नाडणकरवाडी, गुरववाडी आणि बौद्धवाडी येथील ८० घरांतील ९५ कुटुंबे, वडदहसोळ येथील गीतेवाडी व हळदीची खांदवाडी येथील २० घरांतील २९ कुटुंबे, परुळे पाटीलवाडी येथील ३ घरांतील ५ कुटुंबे तसेच महाळुंगे येथील ११ घरांतील १५ कुटुंबे अशा एकूण चार गावांतील ११४ घरांमधील १४३ दरडग्रस्त कुटुंबांचा समावेश आहे.
संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली असून, नागरिकांनीही कोणताही धोका न पत्करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




