
रत्नागिरीत मध्यरात्री कारला भीषण आग; शेजारी उभी असलेली दुचाकीही जळून खाक

रत्नागिरी : शहरातील प्रशांत नगर, स्वरूपानंद नगर परिसरात बुधवारी (३ जून) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास येथील रहिवासी सूरज संजय जाधव यांच्या बंगल्याच्या आवारात उभी असलेली मारुती सुझुकी एसएक्स ४ कारला अचानक आग लागली. मध्यरात्री अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. जाधव यांच्या मालकीची मारुती सुझुकी कार (क्र. एमएच-४६-एन-७३७७ ) ही नेहमीप्रमाणे बंगल्याच्या आवारात उभी होती. रात्री दोनच्या सुमारास गाडीतून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाला निघू लागल्या. काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले आणि आगीच्या ज्वालांनी संपूर्ण कारला कवेत घेतले. ही आग इतकी भीषण होती की, कारच्या शेजारीच उभी असलेली टीव्हीएस रायडर मोटरसायकल (क्र. एमएच-०८-बीए-५५८३) देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत कारसह दुचाकीचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मध्यरात्रीची वेळ असतानाही अग्निशमन दलाच्या पथकाने कमालीची तत्परता दाखवली. उप-अग्निशमन अधिकारी विवेक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख अग्निशमन विमोचक आनंद राऊत आणि दिलीप दळवी, तसेच चालक यंत्र चालक राकेश बाबर यांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या मोहिमेत अग्निशमन विमोचक किशोर, महेश मुरडी, ओम यादव, शुभम गायकवाड आणि देवराज बंडगर या जवानांनी जीवाची बाजी लावून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
बंगल्याच्या आवारात आग लागल्याने ती मुख्य इमारतीपर्यंत पोहोचण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी कौशल्याने आणि वेळेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अधिकृतपणे समजू शकलेले नाही, मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वेळेवर धावून येत आग विझवल्याबद्दल जाधव कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले आहेत.



