
फळसोंडा येथे दुर्दैवी अपघात; गाईला धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू
खेड तालुक्यातील फुरूस-पोयनार मार्गावरील फळसोंडा जामा मशीद परिसरात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे फुरूस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत व्यक्तीची ओळख विकास चिखलकर (वय ५९, रा. सुतारवाडी, फुरूस) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिखलकर हे ३० मे रोजी त्यांच्या ॲक्टिव्हा दुचाकीवरून पाणी आणण्यासाठी जात होते. फळसोंडा जामा मशीद परिसरात अचानक एक गाय रस्त्यावर आल्याने त्यांची दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीची गाईला जोरदार धडक बसली.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.




