
खेड स्थानक परिसरातील स्वामी समर्थ स्टॉल आगीत जळून खाक
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे शेजारचे दुकान वाचले.

खेड : शहरातील एसटी स्टँड परिसरात शनिवारी दि. २४ मे रोजी पहाटे ५:१० वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी समर्थ स्टॉल या दुकानाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत स्टॉल पूर्णतः जळून खाक झाला असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पहाटेच्या सुमारास लागलेल्या या आगीची माहिती मिळताच खेड नगरपरिषद अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या वेगवान आणि तत्पर कारवाईमुळे आग शेजारील दुकानांपर्यंत पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. विशेषतः शेजारचे दुकान सुरक्षित वाचवण्यात अग्निशमन विभागाला यश मिळाले.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे. या बचावकार्यामध्ये फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि सुरज शिगवण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
घटनास्थळी मदतीसाठी कुंदनजी सातपुते, आनंद गोविंद खेडेकर तसेच खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.




