
प्रौढाला मोबाईलवर लिंक पाठवून २ लाख ५१ हजार ८०० रुपयांची फसवणूक
खासगी गाडीच्या आवश्यकतेसाठी गुगल ॲपवरून मागणी केली असता अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर लिंक पाठवून २ लाख ५१ हजार ८०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना १३ ते २१ मे या कालावधीत रात्री ९.१५ च्या सुमारास फिनोलेक्स फाटा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विवेक मनमोहन सोन्स (वय ५५, रा. मेहूल सिनेमा जवळ, कंकू व्हिला अशोकनगर, नाहूर रोड मुलुंड पश्चिम मंबई) यांना फिनोलेक्स गेस्ट हाऊस झाडगाव रत्नागिरी ते फिनोलेक्स कंपनी गोळप असे ये-जा करण्यासाठी खासगी गाडी आवश्यक होती. त्यांनी मोबाईलचे गुगल ॲपवरून ट्रव्हलर अँड सेल्फ ड्राईव्ह लक्ष्मी रत्नागिरी मोबाईल नंबर मिळवून त्यास फोन केला. ट्रव्हलर अँड सेल्फ ड्राईव्ह लक्ष्मी रत्नागिरी मोबाईल नंबरधारक अज्ञात व्यक्तीने फिर्यादीला मोबाईल व्हॉटसॲपवर एक लिंक पाठवून क्रेडीट कार्ड किंवा डेबीट कार्डद्वारे १४९ रुपये रजिस्ट्रेशन फी म्हणून पाठविण्यास सांगितले. त्या प्रमाणे फिर्यादीने लिंकवर क्लिक करून क्रेडीट कार्डचा १६ अंकी नंबर व ३ अंकी सीव्हीव्ही नंबर असे टाईप करून १४९ रुपये भरण्याचा पर्याय क्लिक केला. १३ मे दुपारी दीडच्या फिर्यादी यांच्या मोबाईलवर ओटीपी आला व २ लाख ५१ हजार ८०० रुपये ॲपल इंडिया ट्राजक्शन झाल्याबाबत मोबाईलवर एसएमएस आला. फिर्यादीने फक्त १४९ रुपयांचा क्रेडीट कार्डवरून ट्रॅव्हलर अँड सेल्फ ड्राईव्ह लक्ष्मी रत्नागिरी या कंपनीस व्यवहार केला असताना ॲपल इंडिया बँक खात्यातून २ लाख ५१ हजार ८०० रुपये ऑनलाईन काढून घेवून फिर्यादी यांची ऑनलाईन फसवणूक केली.
या प्रकरणी विवेक सोन्स यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




