चिपळूणसाठी प्रस्तावित सैनिक संकुल साताऱ्याला; आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली खंत

चिपळूण/ प्रतिनिधी : चिपळूण येथे प्रस्तावित असलेले ‘छत्रपती श्री संभाजी महाराज सैनिक संकुल’ रत्नागिरी जिल्ह्याऐवजी सातारा जिल्ह्यासाठी मंजूर झाल्याने आमदार शेखर निकम यांनी खंत व्यक्त केली आहे. कोकणातील माजी सैनिकांसाठी अत्यंत गरजेचा असलेला हा प्रकल्प चिपळूणमध्ये व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

आमदार निकम यांनी सांगितले की, चिपळूण येथे सैनिक संकुल उभारण्यासाठी त्यांनी माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांना अधिकृत पत्राद्वारे सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. चिपळूण तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे सहा हजारांहून अधिक कॅन्टीन कार्डधारक तसेच पाच हजार ईसीएचएस आरोग्य योजनेचे लाभार्थी माजी सैनिक आहेत. सध्या या सेवा भाड्याच्या जागेत सुरू असल्याने वयोवृद्ध आणि आजारी सैनिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर एस.टी. स्थानकाजवळील शासकीय जागेवर सैनिक संकुल उभारण्याचा प्रस्ताव निकम यांनी मांडला होता. सैनिक कल्याण विभागाकडून निधीची तरतूदही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम मंजुरीसाठी आवश्यक असलेली राज्य व्यवस्थापकीय समितीची विशेष सभा तातडीने घेऊन निर्णय करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.

मात्र, रत्नागिरी जिल्ह्यासाठी अपेक्षित असलेले हे संकुल सातारा जिल्ह्यासाठी मंजूर झाल्याने कोकणातील माजी सैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. “कोकणातील सैनिकांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा होता. त्यांच्या सोयीसाठी सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, हा उद्देश होता,” असे आमदार निकम यांनी सांगितले.

दरम्यान, या निर्णयामुळे कोकणातील माजी सैनिक आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, या प्रश्नावर पुढील काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button