
*ठाण्यातील गावदेवी मार्केटला भीषण आग; सुरक्षा रक्षकासह अग्निशमन जवानाचा दुर्दैवी मृत्यू!
*ठाणे येथील नौपाड्यातीलतील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटला गुरुवारी पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. आग विझविण्याच्या शर्थीच्या प्रयत्नांदरम्यान सुरक्षा रक्षक काळू गाडेकर (५३) आणि अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने पालिकेचे प्रभाग समिती कार्यालय बंद होते, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला गुरुवारी पहाटे १.२८ वाजण्याच्या सुमारास नगरसेवक संजय वाघुले यांनी फोन करून गावदेवी भाजी मार्केट इमारतीत आग लागल्याची माहिती दिली. या मार्केटमध्ये लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच अग्निशमन गाड्या, तीन जम्बो वॉटर टँकर, दोन वॉटर टँकर, चार रेस्क्यू वाहने, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, महावितरण कर्मचारी, नौपाडा पोलीस तसेच रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. अतिरिक्त आयुक्त रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, जी.जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी झळके आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एस. वाय. तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रभाग समिती कार्यालयातील सुरक्षा रक्षक काळू गाडेकर हे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अडकले होते. काळू आणि अग्निशमन दलाचे जवान तासभर मोबाईलवर संपर्कात होते आणि ते नेमके कोणत्या बाजूला आहेत याची माहिती घेत होते. आगीत अडकलेल्या सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे आत गेले होते. अखेर त्यांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र धुरामुळे गुदमरल्याने काळू गाडेकर आणि जवान सागर शिंदे या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रीपेक्षा कपड्यांचे व्यवसाय अधिक प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी २५ ते ३० विक्रेते येथे झोपत असल्याचेही सांगितले जात आहे. आग लागल्यानंतर त्यांनी तातडीने बाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली.




