आडीवरे नदीपात्रातील गाळ उपशास प्रारंभ

आमदार किरण सामंत यांच्या पुढाकारामुळे बाजारपेठेला संभाव्य पूरस्थितीपासून दिलासा


राजापूर तालुक्यातील आडीवरे येथील नदीपात्रात साचलेल्या गाळाच्या उपशाच्या कामास प्रारंभ करण्यात आला असून, या कामामुळे आडीवरे बाजारपेठेला संभाव्य पूरस्थितीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले आहे.

गतवर्षी जून महिन्यात झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे आडीवरे येथील नदीला मोठा पूर आला होता. काही मिनिटांतच नदीचे पाणी थेट बाजारपेठेत घुसल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. वाढत्या पाण्याने प्रसिद्ध श्री महाकाली मंदिर परिसरालाही वेढा घालत मंदिराच्या पायर्‍यांपर्यंत धडक दिली होती. सुमारे ४२ वर्षांनंतर प्रथमच आडीवरे बाजारपेठेला एवढ्या गंभीर पूरस्थितीचा सामना करावा लागला होता. या पुरात व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

पूरस्थितीस नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ कारणीभूत असल्याचे ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. त्यानंतर व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी नदीपात्रातील गाळ उपशाची मागणी आमदार किरण सामंत यांच्याकडे केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत त्यांच्या माध्यमातून गाळ उपशाचे काम सुरू करण्यात आले आहे.

या कामाचा शुभारंभ शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सभापती नंदिनी कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपविभागप्रमुख चंद्रकांत पड्यार, सुनील रूमडे, नानू आडीवरेकर, सुरेंद्र कारेकर आदी उपस्थित होते.

नदीपात्रातील गाळ उपशामुळे आगामी पावसाळ्यात संभाव्य पूरस्थितीचा धोका कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, व्यापार्‍यांसह ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button