
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकरची सुवर्णझेप
मुंबई विरार येथे नुकत्याच झालेल्या ‘व्हिक्टरी क्लब ६ वी महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वॉंदो चॅम्पियनशिप २०२६’ या भव्य स्पर्धेमध्ये रत्नागिरी येथील एसआरके तायक्वॉंदो अकॅडमीची खेळाडू स्वरा साक्षी विकास साखळकर हिने नेहमीप्रमाणेच उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने आणि सहकार्याने आयोजित सहाव्या ओपन राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये एसआरके तायक्वांदो क्लबच्या स्वराने कॅडेट गटात ४४ किलो खालील वजनी गटात सुवर्णपदक मिळवून पदकाचे खाते खोलले. त्यानंतर झालेल्या ज्युनियर गटात ४४ किलो वजनी गटात अजून एक सुवर्णपदक आपल्या नावावर केले. पुमसे प्रकारात वैयक्तिक पुमसे प्रकारात कास्यपदक मिळवले. स्वरा ही नगरपालिका शाळा क्रमांक १५ची विद्यार्थिनी असून इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. स्वराला या स्पर्धेसाठी राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच शाहरुख शेख यांचे मार्गदर्शन लाभले .
तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील, उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, सदस्य अजित गार्गे, नीरज बोरसे, सतीश खेमसकर यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याचबरोबर एसआरके क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक आणि समस्त पालक यांनीही स्वराचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




