
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिरात हजारो हापूस आंब्यांची भव्य आरास
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे यंदाचा देवगड हापूस आरास सोहळा, आंबा महोत्सव आणि सोमनाथ मंदिराच्या थेट दर्शनामुळे भक्ती, श्रद्धा आणि पर्यटनाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.सोमवारचा पवित्र दिवस, हजारो हापूस आंब्यांची आकर्षक आरास, नवसपूर्तीचा भावनिक प्रसंग आणि गुजरातमधील सोमनाथ मंदिराचे लाईव्ह दर्शन यामुळे कुणकेश्वर नगरी दिवसभर भक्तिमय वातावरणाने भारावून गेली होती.२०१७ साली देवस्थान ट्रस्टचे तत्कालीन सदस्य शैलेश बोंडाळे यांनी ११ मे रोजी श्री देव कुणकेश्वर मंदिरात देवगड हापूसची आरास करण्याची संकल्पना मांडली होती. देवस्थान ट्रस्टने या उपक्रमाला मान्यता देत प्रत्यक्षात त्याची सुरुवात केली आणि आज या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदा विद्यमान देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांनी या उपक्रमाला आंबा महोत्सवाची जोड देत स्थानिक शेतकरी आणि उत्पादकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
कुणकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने त्यांच्यापर्यंत अस्सल देवगड हापूस पोहोचवावा आणि देवगड हापूसच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवावी, या उद्देशाने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यासाठी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दहा स्टॉल मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते.



