
कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळा येथील सादोबा दर्ग्या शेजारील अतिक्रमण शनिवारी पाडणार
किल्ले विशाळगड पाठोपाठ आता कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळा येथील हजरत पीर शहादुद्दीन खतावली दर्गा (सादोबा दर्गा) समोरील तलावा शेजारी असलेले अनधिकृत अतिक्रमण उद्या शनिवारी पाडले जाणार आहे. सादोबा दर्गा ट्रस्टींनी येत्या दोन दिवसात अतिक्रमण काढून न घेतल्यास ९ मे रोजी प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण केलेले बांधकाम निष्कासीत करण्याचे ठरवले असल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.
प्रतिबंधात्मक आदेश जारी अतिक्रमण निष्कासन कारवाई दरम्यान मुस्लीम धर्मीयांकडून एकत्र येवून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अतिक्रमण कारवाई बाबत माहिती घेण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर पक्ष संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे पन्हाळगड येथे येवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता आहे.अतिक्रमण हटविण्याच्या कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत पन्हाळगड व परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार ८मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १० मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांनी एकत्र येऊ नये. रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला वाहने लावू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सादोबा दर्गा आहे कसा?
पन्हाळा किल्ल्यावरील हजरत पीर शहादुद्दीन कत्ताल वली दर्गा हा कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक स्थळ मानले जाते. हा दर्गा पन्हाळगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ (चार दरवाजाजवळ) कोल्हापूर शहरापासून सुमारे २० किमी अंतरावर स्थित आहे.हा दर्गा सुमारे ९०० वर्षांहून अधिक जुना आहे. या दर्ग्याचे बांधकाम बहामनी किंवा आदिलशाही काळात (इब्राहिम आदिलशाहच्या कारकिर्दीत) वजीर खिजर खान याने केल्याचे सांगितले जाते.
येथील प्रमुख दर्गा हा हजरत पीर शहादुद्दीन कत्ताल वली (ज्यांना “सादोबा” म्हणूनही ओळखले जाते) यांचा आहे. ते इराणमधून आलेले एक सुफी संत होते असे सांगितले जाते. या दर्ग्यामध्ये अनेक दगडी मजारी आहेत, ज्यांचे नक्षीकाम खूप सुंदर आहे. या मजारी तुर्की पद्धतीची रचना दर्शवतात.दर्ग्याच्या समोर पराशर तलाव आणि जवळच दुसरं एक तलाव आहे, ज्यामुळे हा परिसर खूप सुंदर दिसतो. दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न अधूनमधून ऐरणीवर येत असतो. ऐतिहासिक पन्हाळगडावरील हजरत पीर शहादुद्दीन खतावली दर्गा (सादोबा दर्गा) परिसरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. शनिवारी प्रशासनाकडून मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात येणार आहे.
वादग्रस्त पार्श्वभूमी
एप्रिल २०२६ मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ५३ (१-अ) अन्वये प्रशासनाने हजरत पीर शहादुद्दीन खत्तालवल्ली पन्हाळा ट्रस्टला नोटीस बजावली होती. त्या अनुषंगाने ९ एप्रिल रोजी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय पन्हाळा येथे सर्व मुजावर बंधू व स्थानिक नागरिकांची बैठक पार पडली होती. बैठकीनंतर ट्रस्टने सामंजस्याची भूमिका घेत वादग्रस्त क्षेत्रातील स्वच्छतागृह आणि पत्र्याचे शेड स्वतःहून काढून घेतले होते. मात्र, सादोबा तलावातील प्रार्थनास्थळ पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा करत, ते प्रशासनाने त्वरित हटवावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी दिला होता.




