
खेर्डीतील नदीत मृत माशांचा खच
खेर्डी परिसरातून वाहणार्या नदीत गेल्या दोन दिवसांपासून मृत माशांचा खच पडला असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सायंकाळी निदर्शनास आल्यानंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येथील उपप्रादेशिक कार्यालयाने नदीतील पाण्याचे नमुने घेत तपासणीला पाठवले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीच्या पाण्यावर शेकडो मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. नदीच्या आजुबाजूला लोकवस्ती असल्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या दुर्गंधीमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे प्राथमिक अंदाजानुसार, या नदीमध्ये सोडले जाणारे पाणी हे खेर्डी एमआयडीसी परिसरातील कारखान्यांचे असल्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे विषारी पावडर टाकून मासेमारी केली जात असल्याचेही पुढे येत आहे.
दरम्यान, या प्रकाराची माहिती येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाला कळवल्यानंतर अधिकार्यांनी नदीतील पाण्याचे नमुने घेत तपासणीसाठी आपल्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत मासे नेमके कशामुळे मृत्युमुखी पडले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रयोगशाळेतील अहवालानंतर खरे कारण पुढे येणार आहे.www.konkantoday.com




