रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची ग्रंथसंपदा २ लाख करण्याचा संकल्प ॲड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी– रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय महाराष्ट्रातले सर्वात जुने वाचनालय १ लाख १६ हजारांच्या ग्रंथ संपदेच वैभव बाळगून आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथ संपदा या ग्रंथालयात वाचकांची वाचन तृष्णा भागवण्याच काम करत आहेत.
विविध विषय, विविध साहित्य प्रकार यांना सामावून जुन्या साहित्याचे माहेरघर म्हणून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाकडे पाहिले जाते.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची नवी सुसज्ज वास्तु साकारण्याच काम सुरू असतानाच ग्रंथ संपदा आणि वाचक वर्ग वाढीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प वाचन संस्कृतीला अधिक सजग करण्यासाठीच पाऊल ठरेल.
आज महाराष्ट्र दिनाला २ लक्ष ग्रंथ संपदा करण्याचा संकल्प करून नवीन वर्षाच्या प्रारंभी हा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. हा संकल्प इतक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यासाठी जागृत वाचक चळवळीला सक्रिय करावे लागणार आहे. ग्रंथप्रेमी व्यक्ती, विविध अस्थापना, लोकप्रतिनिधी या प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक ठरणार आहे. रत्नागिरीतील प्रत्येक सुज्ञ नागरिकाने, शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने, रत्नागिरीतील सर्व शिक्षक वर्गाने, रत्नागिरीतील प्रतिथयश डॉक्टर्स, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, रत्नागिरीच्या भौगोलिक सौंदर्यात भर घालणारे बिल्डर्स, रत्नागिरीतील नेकीने व्यवसाय करणारे व्यापारी बंधू, विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक काम करणाऱ्या संस्था, अस्थापना, रत्नागिरीतील बँकिंग जगत या प्रत्येक क्षेत्राने आपापल्या वाढदिवशी, वर्धापनदिनी किमान नवी ५ व कमाल कितीही पुस्तके रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला प्रदान करावी. ही पुस्तक भेटीची मुव्हमेंट सर्वदूर पसरली तर २ लाख ग्रंथसंग्रहाचे उद्दिष्ट सहज पूर्ण होईल.
चालू आर्थिक वर्षात ग्रंथ खरेदीसाठी अतिरिक्त निधी उभारून गतवर्षीपेक्षा दुप्पट खर्च नव्या पुस्तक खरेदीसाठी करण्यात येईल. रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालय २ लक्ष ग्रंथ संख्या असणारे कोकणातले पहिले वाचनालय ठरावे. तसेच वाचक संख्याही वाढून ३ हजार व्हावी असा प्रयत्न जाणीवपूर्वक करणार आहोत.
प्रत्येक शैक्षणिक संस्था, प्रत्येक शासकीय, निमशासकीय अस्थापना, रत्नागिरीत कार्यरत असणाऱ्या सामाजिक, धार्मिक संस्था, सांस्कृतिक संस्था, विविध असोसिएशन या सर्वांनी वाचनालयाबरोबर संलग्न होण्याचे विनम्र आवाहन करतानाच सर्वदूर वाचक जागृती अभियानाचे माध्यमातून प्रयत्नपूर्वक वाचक संख्या वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.
चालू आर्थिक वर्षात २ लाख ग्रंथ संख्या व ३००० वाचक संख्या हे उद्दिष्ट ठेवून काम करणार आहे असे ॲड.दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
सर्वांना वाचनालयाकडे नवीन तसेच आपल्याकडील सुस्थितीतील मराठी, इंग्रजी, संस्कृत पुस्तके वाचनालयाला भेट म्हणून द्यावीत अगर पुस्तक खरेदीसाठी आर्थिक मदत करावी असेही आवाहन ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button