
माझ गावं आरोग्य संपन्न गाव अभियानआपल्या गावाला निरोगी, सशक्त व समृध्द बनविण्यासाठी सहभागी व्हा.. पालकमंत्री डॉ. उदय सामंत
–
रत्नागिरी, दि. 2 ) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरु करण्यात आलेले ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान अत्यंत महत्त्वाचे आणि परिवर्तन घडविणारे आहे. आपल्या गावाला निरोगी, सशक्त व समृध्द बनविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. ‘आरोग्य संपन्न’ गाव म्हणून प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासाठी उत्कृष्ट कामगिरी करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, जि.प. सदस्य बाबू म्हाप, जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आदी उपस्थित होते.
डॉ. आठल्ये यांनी संगणकीय सादरीकरण करुन या अभियानाची सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपकेंद्रे यामध्ये आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा देण्यासाठी यादी करा. जिल्ह्यातील कुपोषित बालके, कुपोषित माता यांची माहिती घेऊन सर्वप्रथम त्यावर काम करा. एकही बालक तसेच एकही माता कुपोषित राहता कामा नये. ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करा. प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतींवर फोकस करुन आवश्यक त्या सगळ्या सुविधा निर्माण करा. त्याचबरोबर आरोग्य केंद्रांवरही भर द्यावा.
कशेळी पूर्णपणे सौर ऊर्जेवर
कशेळी गावामध्ये कनकादित्याचे म्हणजेच सूर्यमंदिर आहे. हे संपूर्ण गाव पूर्णपणे सौर ऊर्जेवर करुन, राज्यात एक आदर्श निर्माण करु. याची प्रेरणा इतर जिल्ह्याने घ्यावी, असे हे गाव बनवू, असे सांगून पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, जिल्हा परिषद आरोग्य विभागाला 6 रुग्णवाहिका त्याचबरोबर जिल्हा शासकीय रुग्णालयाला ४ कार्डियाक व ४ सर्वसाधारण रुग्णवाहिका खनिकर्ममधून दिल्या जातील.
आरोग्य संपन्न गाव म्हणून गावांनी उत्कृष्ट कामगिरी करावी
हे अभियान अत्यंत महत्त्वाचे असून, सर्व ग्रामपंचायत आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सर्व नागरिकांचा सक्रीय सहभाग या अभियानात अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक गावांनी आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता राखणे, आरोग्य तपासणी करुन घेणे, लसीकरण पूर्ण करणे आणि आरोग्यविषयक जनजागृतीमध्ये पुढाकार घेणे आवश्यक आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना आरोग्य संपन्न गाव म्हणून गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला आपल्या प्रगतीची संधी उपलब्ध झाली आहे.
हे अभियान एक लोकचळवळ आहे. गावांनी उत्कृष्ट कामगिरी करुन प्रथम पारितोषिक मिळावावे, असेही पालकमंत्री म्हणाले.
000




