मिरजोळे, लक्ष्मीकांत वाडी येथे लाकडाच्या माचाखालील जाळीत अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका

दिनांक 01/05/2026 रोजी मौजे मिरजोळे, लक्ष्मीकांत वाडी येथे कोलगे किराणा दुकानाजवळ असलेल्या लाकडाच्या माचाखालील जाळीत एक बिबट्या अडकलेला असल्याची माहिती श्री. सागर शिवाजी कळंबटे तसेच गावचे माजी सरपंच श्री. गजानन गुरव यांनी सकाळी सुमारे 8.30 वाजता दूरध्वनीद्वारे वनपाल, पाली यांना दिली.
सदर माहिती तत्काळ परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी यांना कळविण्यात आली. त्यानंतर त्यांच्या समवेत घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली असता परिसरात ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आढळली. ग्रामस्थांना सुरक्षित अंतरावर हटवून पुढील कार्यवाही करण्यात आली.
घटनेची माहिती माननीय विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती प्रियंका लगड यांना देण्यात आली. ग्रामस्थांनी जाळीत पकडून ठेवलेल्या बिबट्याला वन विभागाने सुरक्षित ताब्यात घेतले.
पशुधन विकास अधिकारी, मालगुंड येथील डॉ. स्वरूप काळे, डॉ. रानभरे यांच्या मार्फत बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून तात्काळ औषधोपचार सुरू करण्यात आले. तसेच बिबट्याला सुरक्षित ठिकाणी ठेवून आवश्यक आहार देण्यात येत आहे.
सदर बिबट्या हा मादी असून अंदाजे 6 ते 8 महिन्यांचा आहे. सध्या तो वन विभागाच्या निगराणीखाली असून त्याच्या नैसर्गिक अधिवासाचा शोध सुरू आहे.
या कार्यवाहीत परिक्षेत्र वन अधिकारी श्री. प्रकाश सुतार, परिमंडळ वनाधिकारी पाली श्री. एन. एस. गावडे, वनपाल (कांदळवन कक्ष) श्री. मिलिंद डाफळे, वनरक्षक श्री. विराज संसारे, श्रीमती शर्वरी कदम (जाकादेवी), श्रीमती प्राजक्ता चव्हाण, श्री. धनंजय यादव (आरे), चालक महेश धोत्रे, प्राणीमित्र ईशान खानोलकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
ही कार्यवाही माननीय विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विभागीय वन अधिकारी श्रीम. गिरिजा देसाई यांनी आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास वन विभागाच्या टोल-फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 वर तात्काळ संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button