
खेड तालुक्यातील वावे काजू फाटा येथील नदीच्या डोहात पाय घसरून पडल्याने एका १२ वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू
खेड तालुक्यातील वावे काजू फाटा येथील नदीच्या डोहात पाय घसरून पडल्याने एका १२ वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली. मानसी रामचंद्र कदम (रा. धामणंद रोहीदासवाडी, खेड) असे या मृत मुलीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण खेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.मानसी ही २८ एप्रिल रोजी सकाळी आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी वावे काजू फाटा येथील नदीवर गेली होती. आई कपडे धुण्यात मग्न असताना काठावर खेळणाऱ्या मानसीचा अचानक पाय घसरला आणि ती खोल डोहात पडली. मानसी पाण्यात बुडत असल्याचे पाहून तिची आई रीना कदम यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून गावातील लोक धावत नदीवर पोहोचले. ग्रामस्थांनी तातडीने नदीच्या डोहात शोध घेऊन सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास मानसीला पाण्याबाहेर काढले.
मानसीला बेशुद्ध अवस्थेत प्रथम वावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, तेथील डॉक्टरांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले.




