
११ वी प्रवेशाचे नियम बदलले! आता ‘या’ तारखेपासून सुरू होणार ऑनलाईन प्रक्रिया; जाणून घ्या नवीन नियमावली!
11th Admission Policy : राज्यात २००९ पासून विविध विभागात अकरावीची प्रवेश प्रक्रिया टप्प्याटप्प्याने ऑनलाईन पद्धतीने सूरू झाली. मात्र या प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळून आल्या. २०१८ मध्ये उच्च न्यायालयात याबाबत आक्षेप घेणाऱ्या काही याचिका पण दाखल करण्यात आल्या होत्या.
त्यावर न्यायालयीन निर्देश पण आलेत. तसेच प्रवेश प्रक्रियेत आलेले अनुभव, पालक व विद्यार्थ्यांच्या तक्रारी, त्याबाबत शिक्षण संचालक यांचा अहवाल आदी विचारात घेऊन २०२५ – २६ सत्रात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र यात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी व काही तरतुदी निश्चित करण्याची बाब विचाराधीन होती. आता त्यानुसार अकरावी प्रवेशाचे नवे निर्देश देण्यात आले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता ११ वीचे प्रवेश आता पूर्णपणे ऑनलाईन आणि गुणवत्तेच्या आधारे होणार आहेत.
२७ एप्रिलचे आदेश
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ एप्रिल २०२६ रोजी यासंदर्भातील नवीन शासन निर्णय निर्गमित करून प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी व्यापक बदल केले आहेत. प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप आणि फेऱ्या निश्चित झाल्या. यावर्षीपासून संपूर्ण राज्यासाठी विद्यार्थ्यांना एकच प्रवेश अर्ज करावा लागेल, ज्याद्वारे ते राज्यातील कोणत्याही ठिकाणची शाखा निवडू शकतील. प्रवेशासाठी एकूण पाच फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
नियमित ३ फेऱ्या
या फेऱ्या गुणवत्तेनुसार आणि सामाजिक व समांतर आरक्षणाच्या नियमांनुसार घेतल्या जातील. विशेष फेरी (Open to All) नियमित फेऱ्यांनंतर रिक्त जागांसाठी ही फेरी होईल.
मुलींसाठी विशेष फेरी होणार. पाचवी फेरी केवळ मुलींच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाईल.प्रवेशासाठी १० वीच्या उच्चतम ५ विषयांचे गुण विचारात घेतले जातील. दोन विद्यार्थ्यांचे गुण समान असल्यास, जन्मदिनांकानुसार ज्येष्ठ विद्यार्थ्याला प्राधान्य मिळेल.
कोटानिहाय प्रवेश आणि आरक्षण
खाजगी संस्थांना ५० टक्के अल्पसंख्यांक कोटा आणि ५ टक्के व्यवस्थापन कोटा ठेवण्याची मुभा असेल. मात्र हे प्रवेशही ऑनलाईन प्रणालीद्वारेच करावे लागतील. संस्थेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी १० टक्के ‘In House ‘ कोटा राखीव असेल. समांतर आरक्षणांतर्गत महिलांसाठी ३०%, दिव्यांगांसाठी ४%, आणि अनाथ मुलांसाठी १% जागा राखीव असतील. विद्यार्थ्यांना किमान १ आणि कमाल १० महाविद्यालयांचे पसंतीक्रम देता येतील. प्रति विद्यार्थी १०० रुपये नोंदणी शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.
प्रवेश रद्द करणे
- प्रवेश घेतल्यापासून २० दिवसांच्या आत रद्द केल्यास ५% आणि ४० दिवसांच्या आत रद्द केल्यास १०% शुल्क कपात करून उर्वरित रक्कम परत मिळेल.
- १० ते २५ एप्रिल महाविद्यालयांनी माहिती अद्ययावत करणे. ०५ ते १४ मे – विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रोफाईल तयार करणे, असे ठरले आहे.
- प्रवेशाबाबत १० वीच्या निकालानंतर तारीख निश्चित केली जाईल.
- १५ जुलैपर्यंत सर्व शाखांचे शैक्षणिक वर्ग सुरू होणे अनिवार्य आहे.
- शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, ऑनलाईन प्रणालीव्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने केलेले प्रवेश अवैध ठरतील. या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य, विभाग आणि जिल्हा स्तरावर समन्वय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
अन्य शाखा
HSVC व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश मात्र ऑफलाईन पद्धतीने शाळास्तरावर होतील. शालेय शिक्षण विभागाखेरीज आदिवासी विभाग, सामाजिक न्याय व अन्य विभागाच्या राज्य मंडळ संलग्नीत शाळांच्या विभागप्रमुखांनी मान्यता दिल्यास अशा शाळा याच प्रक्रियेत सहभागी होवू शकतील. मात्र ही परवानगी त्या त्या विभागाने ३० एप्रिल पूर्वी देणे अनिवार्य असेल.
खाजगी व्यवस्थापन शाळा
खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालये व वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालय यांनी विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे वरिष्ठना उपलब्ध करून द्यावेत. तसेच विहित मुदतीत माहिती संबंधित संकेतस्थळावर अद्यावत करणे आवश्यक राहील. प्रवेशाचे अनुषंगिक कामकाज हे ठरलेल्या मुदतीत करणे आवश्यक राहणार. हे कामकाज पारदर्शी करण्याची जबाबदारी खाजगी व्यवस्थापनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.




