एक जिद्दी प्रवास: आचारी ते समुपदेशक



​जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या स्त्रियांची अनेक उदाहरणे आपण ऐकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील ज्योती रामदास परब यांचा प्रवास केवळ संघर्षाचा नाही, तर तो एकाकीपणावर मात करून समाजाला दिशा देणाऱ्या खंबीर नेतृत्त्वाचा आहे.
​ज्योतीताईंचे आयुष्य एकेकाळी सुखी-समाधानी होते. मात्र, काळाने घाला घातला आणि त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले. संसाराचा गाडा हाकण्यासाठी आणि मुलीच्या भविष्यासाठी त्यांनी ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू केला. पदर खोचून त्यांनी संघर्षाला सुरुवात केली, पण नियतीला हे सुखही मान्य नव्हते. काही काळाने त्यांच्या पोटच्या मुलीचेही निधन झाले. पती आणि कन्या अशा दोन्ही आधारस्तंभांना गमावल्यानंतर ज्योतीताई पूर्णपणे एकाकी पडल्या. आयुष्यात अंधार दाटून आला होता आणि समोर कोणतीही वाट दिसत नव्हती.
​शून्यातून उभारी: कामाची लाज नाही, तर जिद्द मोठी ​अशा कठीण परिस्थितीत खचून न जाता त्यांनी पुन्हा उभं राहण्याचं ठरवलं. त्यांच्या बहिणीने त्यांना ‘भाकर सेवा संस्थे’बद्दल माहिती दिली. सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून त्या संस्थेशी जोडल्या गेल्या. आयुष्यात पुन्हा सावरण्यासाठी त्यांनी लांजा तालुक्यातील कोंडये येथील ‘अरुणाश्रमात’ चक्क आचारी म्हणून कामाला सुरुवात केली. संकटकाळात कोणत्याही कामाची लाज न बाळगता त्यांनी स्वतःला झोकून दिले. हीच त्यांची जिद्द त्यांना पुढे घेऊन जाणारी ठरली.
​समुपदेशक म्हणून नवी ओळख
​ज्योतीताईंची कामातील कल्पकता, समज आणि दांडगा अनुभव पाहून भाकर सेवा संस्थेने त्यांच्या पुनर्वसनाचा महत्त्वाचा निर्णय घेतला. ३ जुलै २०२५ रोजी त्यांना महिला पुनर्वसन केंद्रात विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या कौशल्याची आणि समाजाप्रती असलेल्या ओढीची दखल घेऊन त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या राजापूर तालुक्यातील समुपदेशन केंद्रात ‘समुपदेशक’ म्हणून करण्यात आली. ज्या महिलेने स्वतःचे आधारस्तंभ गमावले होते, ती आज इतरांचे संसार वाचवण्यासाठी आधार झाली होती.
​पीडितांसाठी मायेचा आधारवड
​गेल्या सात महिन्यांपासून ज्योतीताई राजापूर परिसरात अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. कौटुंबिक हिंसाचार तसेच घरगुती छळाला बळी पडणाऱ्या महिलांसाठी त्या एक खंबीर आधार बनल्या आहेत. केवळ कायदेशीर सल्लाच नव्हे, तर मानसिक आधार देऊन त्या महिलांना पुन्हा उभे करत आहेत. गावोगावी महिला मेळावे घेऊन त्या स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देतात. स्वतःच्या आयुष्यातील दु:ख एका कोपऱ्यात जपून ठेवून दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे मोठे कार्य त्या आज करत आहेत.
​”माणूस एकटा पडला की संपतो असं अनेकांना वाटतं, पण ज्योती परब यांनी दाखवून दिलं की, जर योग्य संस्थेची सोबत आणि मनात जिद्द असेल, तर माणूस पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेऊ शकतो.”
​ज्योती परब यांचा हा प्रवास आजच्या काळातील प्रत्येक स्त्रीसाठी ‘स्वावलंबन’ आणि ‘धैर्याचे’ एक उत्तम उदाहरण आहे. संकटे येतात आणि जातात, पण त्या संकटांच्या छाताडावर पाय देऊन उभं राहून दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसवे पुसण्याचे काम खऱ्या अर्थाने ‘कर्तृत्व’ ठरते.
– अमृता भातडे-धुंदूर
जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button