शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पालगड किल्ल्यावर शिवध्वज पूजन; सौर पथदीपांचे उद्घाटन

खेड : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून किल्ला पालगड येथे महाराजा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गडकिल्ले संवर्धन व अभ्यास मोहीम उत्साहात पार पडली. यावेळी शिवरायांच्या जयघोषाने पालगड किल्ला परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अजय गोगावले व वनश्री गोगावले यांनी प्रतिमेचे पूजन केले. तर शिवध्वज पूजनाचा मान संस्थेचे मार्गदर्शक अमर काते व पूनम काते यांच्या हस्ते पार पडला. शिवध्वजारोहणाचा मान नगरसेविका वैभवी खेडेकर यांना देण्यात आला.
यावेळी व्याख्याते शैलेश निकम यांनी उपस्थितांना शिवकालीन इतिहास, गडकोटांचे संवर्धन आणि युवा पिढीची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते पालगड किल्ल्यासाठी उभारण्यात आलेल्या सौर पथदीप (सोलर स्ट्रिट लाईट) प्रकल्पाचे उद्घाटन. महाराजा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून किल्ल्यावर सौर ऊर्जेवर आधारित पथदीप बसविण्यात आले असून त्यामुळे पर्यटक व दुर्गप्रेमींना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अजय गोगावले, मुख्य सल्लागार निखिल जामसंडेकर, मार्गदर्शक उत्तमकुमार जैन, अमर काते, कायदेशीर सल्लागार अॅड. अभिजीत गांधी, मार्गदर्शक विलास शेळके, स्वराज गांधी, शिर्के सर, उमेश भोसले, पालगड संवर्धन प्रमुख अजिंक्य कदम, तसेच प्रणव मापुस्कर आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराजा प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे पालगड किल्ल्याच्या संवर्धनाला चालना मिळणार असून गडकोटांच्या जतनासाठी सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button